इंधन दरवाढीचा भडका! पाकिस्तानमध्ये पेट्रोल शंभरी पार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2019 11:31 AM2019-05-05T11:31:25+5:302019-05-05T11:36:04+5:30
पाकिस्तानच्या आर्थिक समन्वय समितीची (ECC) एक बैठक घेण्यात आली होती. या बैठकीत पेट्रोलियम उत्पादनांच्या किंमतीत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यानुसार, पेट्रोलच्या किंमतीत तब्बल 9 रुपये प्रती लीटर वाढ करण्यात आली आहे.
इस्लामाबाद - पाकिस्तानमधील नागरिकांच्या समस्या दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. भाजीपाला, दूध यांच्या किंमती वाढल्यामुळे येथील जनता आधीच त्रस्त झाली आहे. त्यातच आता येथील पेट्रोल- डिझेलच्या किंमतीत वाढ झाल्यामुळे लोकांच्या समस्येत आणखी वाढ झाली. पाकिस्तानच्या आर्थिक समन्वय समितीची (ECC) एक बैठक घेण्यात आली होती. या बैठकीत पेट्रोलियम उत्पादनांच्या किंमतीत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यानुसार, पेट्रोलच्या किंमतीत तब्बल 9 रुपये प्रती लीटर वाढ करण्यात आली आहे.
पाकिस्तानमधील नागरिकांना आता एक लीटर पेट्रोलसाठी 108 रुपये मोजावे लागणार आहेत. तर बैठकीत डिझेलच्या किंमतीत 4.89 रुपये प्रती लिटर तर लाईट डिझेलमध्ये 6.40 रुपये प्रती लीटर वाढ झाली आहे. तसेच केरोसिनच्या किंमतीत 7.46 रुपये प्रती लीटरपर्यंत प्रस्तावित वाढीला मंजुरी देण्यात आली आहे. 'ऑईल एन्ड गॅस रेग्युलटरी अथॉरिटी' ने पेट्रोलच्या किंमतीत 14 रुपये प्रती लीटरपर्यंत वाढीची मागणी केली होती. त्यानंतर पंतप्रधान इमरान खान यांनी हे प्रकरण आर्थिक समन्वय समिती (ECC) कडे पाठवलं होतं. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत वृद्धी आणि मुद्रा अवमूल्यनमुळे हा निर्णय पाकिस्तानला घ्यावा लागला आहे.
अबब..! पाकमध्ये 180 रुपये प्रतिलिटर विकलं जातंय दूध
कराची डेयरी फार्मर्स असोसिएशनने काही दिवसांपूर्वी अचानक दुधाच्या दरात वाढ केली आहे. ही वाढ 23 रुपये प्रतिलिटर इतकी केली आहे. त्यामुळे आता दुधाचा भाव लिटरमागे 120 रुपयांपर्यंत पोहोचला आहे. किरकोळ बाजारात दूध 100 ते 180 रुपये प्रतिलिटर विकले जात आहे. पाकिस्तानमधील डॉन या वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, डेयरी फार्मर्स एसोसिएशनने पाकिस्तान सरकारकडे अनेकदा दुधाचे दर वाढण्याची मागणी केली होती. मात्र, सरकारने याकडे दुर्लक्ष करत कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. परिणामी डेयरी फार्मर्स एसोसिएशनने स्वत:च दुधाच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर पाकिस्तान प्रशासनाने दुधाच्या दरात वाढ करण्याचा डेयरी फार्मर्स एसोसिएशनचा निर्णय चुकीचा असल्याचे म्हटले आहे. तसेच, वाढीव दराने दूध विक्री करणाऱ्या किरकोळ विक्रेत्यांवर कारवाई करण्यात येत असल्याचे सांगितले आहे. पाकिस्तानच्या प्रशासनाने दुधाचे दर प्रतिलीटर 94 रुपये केले आहेत. मात्र, किरकोळ विक्रेते प्रतिलिटर 100 ते 180 रुपयांपर्यंत दुधाची विक्री करत आहेत. त्यामुळे प्रशासनाने वाढीव दराने दूध विक्री करणाऱ्या दुकानदारांवर कारवाई करण्याचे आदेश पाकिस्तानमधील सर्व उपायुक्तांना आदेश दिले आहेत.
पाकिस्तानमध्ये महागाईने गेल्या पाच वर्षांचा रेकॉर्ड मोडला आहे. गेल्या मार्च महिन्यात पाकिस्तानमध्ये महागाईचा दर 9.4 टक्क्यांपर्यंत पोहोचला होता. महागाईत वाढ, रुपयाची घसरण आणि कच्च्या तेलाच्या वाढत्या किंमती यामुळे पाकिस्तानच्या मध्यवर्ती बँकेने व्याजदरात 10.75 टक्क्यांची वाढ केली. पाकिस्तानात महागाई वाढण्यामागे जागतिक स्तरावर कच्च्या तेलाच्या वाढत्या किंमती हे मुख्य कारण असल्याचे सांगितले जात आहे.