विरोधकांचा बिग प्लॅन! एका आठवड्यात इम्रान होणार आऊट; आता या नेत्याच्या हाती जाणार पाकिस्तानची धुरा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2022 03:03 PM2022-03-28T15:03:48+5:302022-03-28T15:05:34+5:30
याच बरोबर, इम्रान खान यांचे कट्टर विरोधक जमीयत उलेमा-ए-इस्लामाचे नेते मौलाना फजलुर्रहमान यांना आरिफ अल्वी यांच्या जागी नवे राष्ट्रपती म्हणून घोषित केले जाऊ शकते.
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या खुर्ची खालची वाळू सरकताना दिसत आहे. यातच त्यांचे मित्रपक्षही त्यांची साथ सोडताना दिसत आहेत. पाकिस्तान मुस्लिम लीगने (Q) पीएमएल-नवाज या विरोधी पक्षाशी हातमिळवणी केली आहे. येत्या आठवडाभरात इम्रान खान यांना पदाचा राजीनामा द्यावा लागेल आणि त्यानंतर नवीन सरकार स्थापन होईल, असा विश्वास दोन्ही पक्षांना आहे.
या संपूर्ण घटनांची माहिती असणाऱ्यांच्या मते, इम्रान खान यांच्यानंतर नवाज शरीफ यांचे छोटे भाऊ शाहबाज शरीफ यांना पीएम करण्यासंदर्भात बोलणे झाले आहे. याच बरोबर इम्रान खान यांचे कट्टर विरोधक जमीयत उलेमा-ए-इस्लामाचे नेते मौलाना फजलुर्रहमान यांना आरिफ अल्वी यांच्या जागी नवे राष्ट्रपती म्हणून घोषित केले जाऊ शकते. याशिवाय, चेअरमनचे पद पाकिस्तान पीपल्स पार्टीचे नेते युसूफ रझा गिलानी यांच्याकडे जाण्याची शक्यता आहे.
पाकिस्तानातील विरोधी पक्षांनी आज दुपारी 4 वाजता संसदेत इम्रान खान यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव मांडण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय इम्रान खान यांच्या पक्षाचे नेते पंजाबचे मुख्यमंत्री उस्मान बुजदार यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव आणण्यात आला आहे. त्यांच्या जागी चौधरी परवेझ इलाही यांना मुख्यमंत्रीपद दिण्याची तयारी सुरू आहे. जे सध्या पंजाब विधानसभेचे अध्यक्ष आहेत.
पंजाब विधानसभेत एकूण 126 आमदारांनी अविश्वास ठराव मांडला आहे, परंतु मुख्यमंत्र्यांना पदावरून हटवण्यासाठी किमान 186 मते त्याच्या बाजूने येणे आवश्यक आहे.