अमेरिकेत इम्रान खान यांच्या स्वागताला कोणीच नाही; ट्विटरवर खिल्ली
By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2019 03:48 PM2019-07-21T15:48:56+5:302019-07-21T15:50:09+5:30
खान यांच्या बचावासाठी धावला भारतीय नेता
वॉशिंग्टन: पंतप्रधान म्हणून इम्रान खान पहिल्यांदाच अमेरिकेच्या दौऱ्यावर गेले आहेत. मात्र अमेरिकेत त्यांच्या स्वागताला प्रशासनातील एकही मोठा नेता आला नाही. त्यामुळे सध्या ट्विटरवर खान यांची खिल्ली उडवली जात आहेत. इम्रान खान कतार एअरवेजच्या विमानानं सर्वसामान्य व्यक्तीप्रमाणे अमेरिकेत पोहोचले. त्यांचा दौरा तीन दिवसांचा असून या कालावधीत ते पाकिस्तानी राजदूताच्या निवासस्थानी वास्तव्यास असतील.
कतार एअरवेजच्या विमानातून अमेरिकेत दाखल झालेल्या इम्रान खान यांचा व्हिडीओ पीटीआयनं ट्विट केला आहे. यामध्ये खान एका सामान्य व्यक्तीसारखे विमानातून उतरताना दिसत आहेत. अनेकांनी यावरुन खान यांची खिल्ली उडवली. मात्र या टीकाकारांचा नॅशनल कॉन्फरन्सचे नेते आणि जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी समाचार घेतला. 'त्यांनी (खान यांनी) त्यांच्या देशाचा पैसा वाचवला. ते बऱ्याच नेत्यांसारखे अहंकार घेऊन जात नाहीत,' असं म्हणत अब्दुल्ला यांनी खान यांचा बचाव केला.
खान त्यांच्या अमेरिकेच्या दौऱ्यादरम्यान पाकिस्तानचे राजदूत अजद मजीद खान यांच्या शासकीय निवासस्थानी राहतील. विमानतळावर त्यांच्या स्वागताना परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी उपस्थित होते. यावेळी अमेरिकेचे रहिवासी असलेल्या काही पाकिस्तानी लोकांनी त्यांचं स्वागत केलं. खान त्यांच्या अमेरिका भेटीदरम्यान अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतील. या भेटीत संरक्षण, व्यापार आणि कर्जाच्या मुद्द्यावर चर्चा होईल.