जरा 'त्या' भारतीयांकडून शिका! भरबैठकीत पाकिस्तानी पंतप्रधान भडकले; अधिकाऱ्यांवर कडाडले

By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2021 12:30 PM2021-05-06T12:30:07+5:302021-05-06T12:33:15+5:30

व्हिडीओ कॉन्फरन्सिंगमध्ये भारतीय अधिकाऱ्यांची स्तुती; पाकिस्तानी राजदूतांची खरडपट्टी

pakistan pm imran khan expresses displeasure over working of embassies says indian counterparts more proactive | जरा 'त्या' भारतीयांकडून शिका! भरबैठकीत पाकिस्तानी पंतप्रधान भडकले; अधिकाऱ्यांवर कडाडले

जरा 'त्या' भारतीयांकडून शिका! भरबैठकीत पाकिस्तानी पंतप्रधान भडकले; अधिकाऱ्यांवर कडाडले

Next

इस्लामाबाद: पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पाकिस्तानच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची चांगलीच खरडपट्टी काढली आहे. भारतीय राजदूतांच्या कार्यशैलीची प्रशंसा करत खान यांनी त्यांच्या अधिकाऱ्यांना सुनावलं. भारताच्या राजदूतांकडून काहीतरी शिका, अशा शब्दांत खान यांनी अधिकाऱ्यांना झापलं. यावेळी खान यांनी पाकिस्तानच्या राजदूतांच्या कार्यपद्धतीबद्दल नापसंती व्यक्त केली. 

भारतीय दूतावासातील अधिकारी आणि कर्मचारी वर्ग अधिक सक्रिय असतो. त्यांच्याकडून परदेशात असलेल्या भारतीय नागरिकांना उत्तम सेवा दिली जाते, अशा शब्दांत खान यांनी भारतीय दूतावासातील अधिकाऱ्यांचं तोंडभरून कौतुक केलं. एका वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार, खान यांनी जगभरातील देशांमध्ये असलेल्या पाकिस्तानच्या राजदूतांसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधला. पाकिस्तानचे राजदूत त्यांच्या कामाबद्दल उदासीन असतात. त्यामुळे विशेष करून मध्य पूर्वेतील सेवांवर परिणाम होतो, असं म्हणत खान यांनी नाराजी व्यक्त केली.

दिवसा कोरोना जागृती, रात्री दारूची तस्करी; भाजप कार्यकर्ते वापरत असलेली गाडी जप्त

'सौदी अरेबियामध्ये असलेल्या दूतावासातील काही कर्मचारी काम करत नसल्याची माहिती मला मिळाली आहे. कुवेतमध्ये असलेल्या नाड्राच्या (नॅशनल डेटाबेस अँड रजिस्ट्रेशन अथॉरटी) कार्यालयात तैनात असलेले कर्मचारी मार्गदर्शन करण्याऐवजी हफ्ते खातात. इथला एक अधिकारी बोगस कागदपत्रं तयार करण्याचं काम करतो असंदेखील मला समजलं आहे. हे ऐकून मला धक्काच बसला,' असं खान व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये म्हणाले.

भारतीय राजदूत कसे काम करतात ते पाहा. त्यांचा आदर्श घ्या, अशा शब्दांत खान यांनी भारतीय अधिकाऱ्यांचं कौतुक केलं. भारतीय राजदूत आपल्या नागरिकांना अतिशय उत्तम दर्जाची सेवा देतात. इतकंच नव्हे, तर त्यांच्या देशात जास्तीत जास्त गुंतवणूक आणण्यासाठी ते सदैव तत्पर असतात. त्यांच्याकडून काहीतरी शिका, असा सल्ला खान यांनी त्यांच्या राजदूतांना दिला.

Web Title: pakistan pm imran khan expresses displeasure over working of embassies says indian counterparts more proactive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.