इम्रान खान यांना पंतप्रधानपदाचा राजीनामा द्यावा लागणार?; पाकिस्तानात वेगवान घडामोडी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2021 09:17 AM2021-11-15T09:17:43+5:302021-11-15T09:23:06+5:30
लष्कर आणि खान यांच्यातील वाद टोकाला; लष्करानं खान यांना दिले दोन पर्याय
नवी दिल्ली/इस्लामाबाद: गुप्तचर यंत्रणा आयएसआयच्या प्रमुखपदावर करायच्या नियुक्तीवरून पाकिस्तानी सरकार आणि लष्कर यांच्यात निर्माण झालेला वाद टोकाला गेला आहे. लष्करानं इम्रान खान यांना पंतप्रधान पदावरून हटवण्याची तयारी सुरू केली आहे. लेफ्टनंट जनरल नदीम अंजुम २० नोव्हेंबरपासून आयएसआयचं डीजीपद सांभाळणार आहेत. त्यांच्या नियुक्तीवरून इम्रान खान आणि लष्करप्रमुख कमर जावेद बाजवा यांच्यामध्ये संघर्ष झाला. आयएसआयची धुरा लेफ्टनंद जनरल फैज हमीद यांच्याकडेच ठेवली जावी, असं बाजवा यांना वाटतं.
इम्रान खान यांच्यापुढे दोन पर्याय ठेवण्यात आल्याचं वृत्त सीएनएन-न्यूज१८ नं सुत्रांच्या हवाल्यानं दिलं आहे. इम्रान खान यांनी स्वत:चं २० नोव्हेंबरआधी पंतप्रधानपदाचा राजीनामा द्यावा हा पहिला पर्याय देण्यात आलेला आहे. तर संसदेत विरोधक बदल करतील, असा दुसरा पर्याय आहे. त्यामुळे या दोन्ही पर्यायांत खान यांची खुर्ची जाणं निश्चित आहे. येत्या काही आठवड्यांत सत्ताधारी पक्ष पाकिस्तान तहरीक ए इन्साफच्या अडचणी वाढतील, अशी माहितीदेखील सुत्रांनी दिली आहे. मुतहिदा कौमी मूव्हमेंट आणि पाकिस्तान मुस्लिम लीग हे दोन मित्रपक्ष पाकिस्तान तहरीक ए इन्साफची साथ सोडतील, असं सूत्रांनी सांगितलं आहे.
पीटीआयचे परवेज खटक आणि पाकिस्तान मुस्लिम लीगचे शाहबाज शरीफ पाकिस्तानचे पुढील पंतप्रधान असू शकतात. पाकिस्तान सरकारनं गेल्याच आठवड्यात तहरीक ए लब्बेक पाकिस्तानच्या शेकडो समर्थकांची सुटका केली आहे. हिंसक आंदोलनं संपुष्टात आणण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला. हा समूह पाकिस्तान सरकारविरोधात आंदोलनं करत होता. एप्रिलमध्ये अटक करण्यात आलेला तहरीक ए लब्बेक पाकिस्तानचा नेता साद रिझवीची सुटका करावी अशी त्यांची मागणी होती.