भारताचा सर्वात जुना मित्र दुरावतोय, पाकिस्तान जवळीक वाढवतोय; मोदी सरकारचं टेन्शन वाढलं!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2022 06:35 PM2022-02-19T18:35:21+5:302022-02-19T20:12:41+5:30
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान लवकरच करणार दौरा; भारताचा सर्वात जुना मिक्ष दुरावतोय
इस्लामाबाद/मॉस्को: भारताचा जुना मित्र असलेल्या रशियासोबत जवळीक वाढवण्याचा प्रयत्न पाकिस्तानकडून सुरू आहे. त्यासाठी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान मॉस्कोच्या दौऱ्यावर जाणार आहेत. विशेष म्हणजे यासाठी पाकिस्ताननं पुढाकार घेतला आहे. याआधी खान यांनी अनेकदा रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांना पाकिस्तानला येण्याचं आमंत्रण दिलं. मात्र पुतीन यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं. आता खान पुतीन यांच्या भेटीसाठी रशियाला जाणार आहेत. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयानं यात्रेच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
इम्रान खान रशियाला आपल्या बाजूनं वळवण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यांचा रशिया दौरा याच प्रयत्नांचा भाग आहे. त्याआधी रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयानं आपली भूमिका स्पष्ट केली आहे. 'रशिया आणि पाकिस्तान यांच्यातील सहकार्याचा उद्देश कोणत्याही तिसऱ्या देशाला लक्ष्य करणं नाही. शांतता, सुरक्षा आणि स्थैर्यासाठी दोन्ही देशांनी सहकार्याची भूमिका घेतली आहे,' असं परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या मारिया जखरोवा यांनी सांगितलं.
भारतासोबत असलेले ऐतिहासिक संबंध यामुळे रशियानं आतापर्यंत पाकिस्तानकडे कायम दुर्लक्ष केलं. मात्र जागतिक स्तरावरील बदललेलं राजकारण, भारत-अमेरिकेची जवळीक यामुळे रशियानं परराष्ट्र धोरण बदललं. खान यांच्या रशिया दौऱ्यात दोन्ही देशांमधील संबंध, उत्तर-दक्षिण गॅस पाईपलाईन योजना आणि काही महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा होऊ शकते. खान यांच्या सोबत एक मोठं प्रतिनिधी मंडळ रशियाला जाणार आहे. गेल्या वर्षी रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव यांनी पाकिस्तानचा दौरा केला होता.