इम्रान खान यांची भारताकडे याचना; 'शांततेची एक संधी द्या, दिलेला शब्द पाळेन!'
By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2019 11:06 AM2019-02-25T11:06:03+5:302019-02-25T11:18:35+5:30
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी शांततेची एक संधी द्या अशी याचना पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे केली आहे. 'आपण आपल्या शब्दावर ठाम असून भारताने पुलवामा हल्ल्यासंबंधी ठोस पुरावे दिले तर तात्काळ कारवाई करू' असे इम्रान खान यांनी म्हटले आहे.
इस्लामाबाद - पुलवामा येथे झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात 40 जवान शहीद झाले आहेत. अवंतीपुरा दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली असून शहीद वीर जवानांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील संबंधांमधील तणावात आणखी भर पडली आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी शांततेची एक संधी द्या अशी याचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे. 'आपण आपल्या शब्दावर ठाम असून भारताने पुलवामा हल्ल्यासंबंधी ठोस पुरावे दिले तर तात्काळ कारवाई करू' असे इम्रान खान यांनी म्हटले आहे.
राजस्थानमध्ये पंतप्रधान मोदी यांनी 'दहशतवादविरोधात संपूर्ण देशात संताप व्यक्त केला जात आहे. हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांविरोधात कारवाई करण्यासाठी आम्ही जलद गतीने पावलं उचलत आहोत. यावेळी बरोबरीचा हिशोब चुकता केला जाणार. हा बदललेला भारत आहे. हे दुख: सहन केले जाणार नाही. दहशतवादाला कसे चिरडायचे ते आम्हाला चांगले कळते .' असे म्हटले होते. मोदी यांच्या सभेनंतर इम्रान खान यांनी शांततेची संधी देण्याचे आवाहन केले आहे.
'इम्रान खान यांची पंतप्रधानपदी निवड झाल्यानंतर त्यांना शुभेच्छा देण्यासाठी फोन केला होता. तेव्हा मी पठाणचा मुलगा असून शब्द पाळणार असे म्हणाले होते. बघू आता काय करतात' असे मोदी सभेत म्हणाले होते. त्यानंतर पाकिस्तानी पंतप्रधानांच्या कार्यालयाकडून एक निवेदन प्रसिद्ध करण्यात आले आहे. पंतप्रधान इम्रान खान आपल्या शब्दावर ठाम असून भारताने पुलवामा हल्ल्याचे ठोस पुरावे दिले तर तात्काळ कारवाई करू. पंतप्रधान मोदींनी शांततेची एक संधी द्यावी असे त्यामध्ये म्हटले आहे.
गुरुवारी (14 फेब्रुवारी) जम्मूहून श्रीनगरला जाणाऱ्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यावर हा भ्याड हल्ला झाला. देशात जवानांवर झालेला हा आतापर्यंतचा सर्वांत मोठा हल्ला आहे. पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार अब्दुल रशीद गाझीचा खात्मा केल्यानंतर भारतीय लष्कराने दहशतवाद्यांना आणि त्यांना पोसणाऱ्यांना कठोर इशारा दिला आहे. दहशतवाद्यांनी एकतर हत्यारं सोडून समर्पण करावं किंवा मग मरणास सामोरं जाण्यास तयार राहावे, असा स्पष्ट इशाराच भारतीय लष्कराने पत्रकार परिषदेत दिला आहे. ''दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदवर पाकिस्तानी सैन्य आणि ISIचा वरदहस्त आहे. जैश-ए-मोहम्मद पाकिस्तानी सैन्याचंच अपत्य आहे'',असा थेट निशाणाच भारतीय लष्कराने पाकिस्तानवर केला आहे. तसंच आगामी काळातही दहशतवाद्यांविरोधातील मोहीम तीव्र स्वरुपात राबवली जाईल आणि काश्मीर खोऱ्यात घुसखोरी करणाऱ्या प्रत्येक दहशतवाद्याचा खात्मा केला जाईल. त्यांना जिवंत सोडलं जाणार नाही', असेही भारतीय लष्कराने ठणकावून सांगितले आहे.