इम्रान खान यांचं भाषण पाकिस्तानी लष्कराकडून एडिट? 6 मिनिटांच्या व्हिडीओत 20 कट्स
By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2019 05:06 PM2019-02-19T17:06:33+5:302019-02-19T17:08:39+5:30
पुलवामा हल्ल्यात हात नसल्याची खान यांच्याकडून सारवासारव
इस्लामाबाद: जम्मू-काश्मीरमधील पुलवामा हल्ल्यानंतर भारत आक्रमक झाला आहे. एका बाजूला पाकिस्तानच्या आर्थिक कोंडीचे प्रयत्न सुरू असताना दुसऱ्या बाजूनं दहशतवाद्यांविरोधातल्या कठोर कारवाईला वेग आला आहे. पुलवामा हल्ल्याच्या सूत्रधारांना लष्कर आणि पोलिसांना संयुक्त कारवाई करत यमसदनी धाडलं. यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी आज खुलासा केला. पुलवामा हल्ल्यात पाकिस्तानचा हात नसल्याची सारवासारव त्यांनी केली. मात्र इम्रान खान यांच्या 6 मिनिटांच्या व्हिडीओत 20 पेक्षा जास्त एडिट आहेत. त्यामुळे पाकिस्तानी लष्करानं खान यांचं स्पष्टीकरण एडिट केलं का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खान यांनी भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 1.30 च्या सुमारास देशाला संबोधित केलं. भारत कोणत्याही ठोस पुराव्यांशिवाय आरोप करत असल्याचा दावा त्यांनी केला. खान देशाला संबोधित करतील, अशी सूचना आधीच देण्यात आली होती. मात्र इम्रान खान यांचा व्हिडीओ रेकॉर्डेड होत असल्याचं आता समोर आलं आहे. विशेष म्हणजे यात जवळपास 20 हून अधिक कट्स दिसत आहेत. त्यामुळे हा व्हिडीओ एडिट करुन मगच तो प्रसारित करण्यात आला, हे सिद्ध होतं. पाकिस्तानचे पंतप्रधान लष्कराच्या परवानगीशिवाय कोणतेही निर्णय घेत नाहीत, हे जगजाहीर आहे. त्यामुळे या एडिटमागे पाकिस्तानचं लष्कर असल्याची चर्चा जगभरात सुरू आहे.
Prime Minister Imran Khan giving Policy Statement of Pakistan on the Pulwama attack in Indian Occupied Kashmir.@ImranKhanPTI
— PTI (@PTIofficial) February 19, 2019
(19.02.19)#PMIKTheStatesmanpic.twitter.com/bLNvH5PMiY
इम्रान खान यांचं भाषण 6 मिनिटांचं आहे. यामध्ये 1.40 सेकंद, 1.48 सेकंद, 1.55 सेकंदांवर कट्स आहेत. इथून कट्सची सुरुवात होते. यानंतर व्हिडीओ संपेपर्यंत अनेक ठिकाणी कट्स पाहायला मिळतात. त्यामुळे व्हिडीओ खूप ठिकाणी एडिट करण्यात आला, हे स्पष्टपणे दिसून येतं. इम्रान खान यांना पंतप्रधान करण्यात लष्कराची महत्त्वाची भूमिका असल्याच्या चर्चा अनेकदा झाल्या आहेत. लष्कराचा आशीर्वाद असल्यानंच खान पंतप्रधान झाले, असं विश्लेषण जागतिक घडामोडीच्या जाणकारांनी अनेकदा केलं आहे. खान यांनी निवडणूक प्रचारादरम्यान अनेकदा लष्कराचा कैवार घेणारी विधानं केली होती. याशिवाय ते सत्तेवर आल्यानंतर पाकिस्तानातील दहशतवादी कारवाया कमी झालेल्या नाहीत.