Pakistan PM Saudi Visit: पाक पंतप्रधान सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर, मशिदीत जाताच लोकांनी दिल्या 'चोर-चोर'च्या घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2022 09:35 AM2022-04-29T09:35:03+5:302022-04-29T09:35:19+5:30
Pakistan PM Saudi Visit: पाकिस्तानचे नवनिर्वाचीत पंतप्रधान शेहबाज शरीफ तीन दिवसांच्या सौदी अरेबिया दौऱ्यावर गेले आहेत. यावेळी त्यांचे शिष्टमंडळ मदिना येथील मस्जिद-ए-नबावी येथे पोहोचले असता, लोकांनी मोठ्याने 'चोर-लुटेरे' अशा घोषणा सुरू केल्या.
Pakistan PM Saudi Arabia Visit: पाकिस्तानचे नवनिर्वाचीत पंतप्रधान शेहबाज शरीफ यांना सौदी अरेबियात मोठ्या विरोधाचा सामना करावा लागला. शरीफ यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ तीन दिवसांच्या सौदी अरेबिया दौऱ्यावर गेले आहे. यादरम्यान हे शिष्टमंडळ मदिना येथील मस्जिद-ए-नबावी येथे पोहोचले असता, लोकांनी मोठ्याने 'चोर-लुटेरे परत जा...' अशा घोषणा सुरू केल्या. सोशल मीडियावर या घटनेचा एक व्हिडिओही व्हायरल होत आहे.
I am present in Madina Shareef. As Bugti & Maryam Aurangzeb entered, slogans of CHOR CHOR greeted them. No living Muslim should be subject to that in the Mosque of Prophet (PBUH). So shameful, so shameful, so shameful. pic.twitter.com/ZK1GAUdaHY
— Sahibzada Jahangir (@ChicoJahangir) April 28, 2022
घोषणाबाजी करणाऱ्यांना अटक
एएनआय या वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, या घटनेनंतर पोलिसांनी पावित्र्याचे उल्लंघन केल्याबद्दल घोषणा देणाऱ्यांना अटक केली. एका व्हिडिओमध्ये पाकिस्तानचे माहिती-प्रसारण मंत्री मरियम औरंगजेब आणि नॅशनल असेंब्ली सदस्य शाहजैन बुगती इतरांसह दिसत आहेत. ते मदिना येथील मस्जिद-ए-नबावी येथे पोहोचले असता, लोकांनी घोषणा सुरू केल्या. विशेष म्हणजे, त्यांच्यासोबत पंतप्रधान शरीफ नव्हते.
निदर्शनांमागे इम्रानला जबाबदार धरले
पाकिस्तानी वृत्तपत्रानुसार, औरंगजेबने या निषेधामागे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना जबाबदार धरले आहे. एक्सप्रेस ट्रिब्यूनने औरंगजेबच्या हवाल्याने म्हटले आहे की, 'मी या पवित्र भूमीवर त्या व्यक्तीचे नाव घेणार नाही, कारण मला या भूमीचा राजकारणासाठी वापर करायचा नाही. पण त्यांनी (इमरान खान) पाकिस्तानी समाज उद्ध्वस्त केला आहे.' दरम्यान, पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ हे सौदी अरेबियाच्या तीन दिवसांच्या अधिकृत दौऱ्यावर आहेत. पाकिस्तानच्या पंतप्रधानांच्या सौदी दौऱ्यावर डझनभर अधिकारी आणि राजकीय नेते त्यांच्यासोबत गेले आहेत.
घटनेचे पाकिस्तानमध्ये पडसाद
दरम्यान, सौदी अरेबियात घडलेल्या घटनेचे पाकिस्तानात पडसाद उमटू लागले आहेत. पाकिस्तानच्या जम्हूरी वतन पक्षाचे अध्यक्ष शाहझैन बुगती यांच्या समर्थकांनी शुक्रवारी सौदी अरेबियातील घटेनेनंतर पाक संसदेचे माजी उपसभापती कासिम सुरी यांच्यावर हल्ला केला. त्यांना मारहाण करतानाचा एक व्हिडिओ समोर आला आहे. पाकिस्तानी पत्रकार मुर्तझा अली शाह यांनी ट्विटरवर पोस्ट केला आहे.
Shahzain Bugti’s supporters in Islamabad attack former deputy speaker Qasim Suri in retaliation of what happened to Shahzain in Saudi. Very unfortunate. pic.twitter.com/q5ldqDpLJy
— Murtaza Ali Shah (@MurtazaViews) April 28, 2022
पाक पंतप्रधान सौदी अरेबियाकडून 3.2 अब्ज डॉलरची मागणी करणार
विशेष म्हणजे 11 एप्रिल रोजी शरीफ यांनी पाकिस्तानचे 23 वे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. या भेटीदरम्यान शरीफ सौदी अरेबियाकडून 3.2 अब्ज डॉलरच्या अतिरिक्त पॅकेजची मागणी करणार आहेत. पाकिस्तानच्या परकीय चलनाच्या साठ्यात आणखी घट होऊ नये यासाठी ते ही विनंती करणार आहे. सौदी अरेबियाने इम्रान खानच्या कार्यकाळात आधीच कर्जबाजारी झालेल्या पाकला 3 अब्ज डॉलर्सची मदत केली होती.