Pakistan Political Crisis: पाकिस्तानात मोठा राजकीय भूकंप; इम्रान खान म्हणतात-'मी राजीनामा देणार नाही...'
By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2022 09:14 PM2022-03-27T21:14:47+5:302022-03-27T21:22:37+5:30
Pakistan Political Crisis: पाकिस्तानमध्ये मोठे राजकीय संकट उद्भवले आहे. पंतप्रधान इम्रान खान यांच्याविरोधात विरोधकांनी अविश्वास प्रस्ताव आणल्यानंतर इम्रान खान यांची सत्ता जाण्याची शक्यता वर्तण्यात येत आहे.
इस्लामाबाद: पाकिस्तानमध्ये मोठे राजकीय संकट उद्भवले आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्यासाठी उद्याचा दिवस फार महत्वाचा आहे. विरोधकांनी अविश्वास प्रस्ताव आणल्यानंतर इम्रान यांची सत्ता जाण्याची शक्यता वर्तण्यात येत आहे. पण, या सर्व संकटाच्या पार्श्वभूमीवर इम्रान खान यांनी आपल्या राजीनाम्याच्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. रविवारी इस्लामद येथे एका सभेला संबोधित करताना इम्रान खान यांनी ठणकावून सांगितले की, ते राजीनामा देणार नाहीत आणि त्यांचा पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणार.
'राजीनामा देणार नाही'
रॅलेली संबोधित करताना इम्रान खान म्हणाले की, "आमच्या सरकारची पाच वर्षे पूर्ण झाल्यानंतर पाकिस्तानच्या जनतेला देशाचा विकास दिसेल. आतापर्यंत इतर कोणत्याही सरकारने पाकिस्तानचा विकास केला नाही. मी 25 वर्षांपूर्वी राजकारणात फक्त एकाच गोष्टीसाठी आलो होतो, ती म्हणजे पाकिस्तानची निर्मिती ज्या दृष्टीकोनाने झाली ते पुढे नेणे. जे काम आम्ही तीन वर्षात केले, ते काम यापूर्वी कोणी केले नव्हते.''
'आधीच्या सरकारांचा भार आम्ही उचलत आहोत'
ते पुढे म्हणाले की, गरीब देश यामुळे गरीब असतो, कारण तिथे व्हाईट कॉलर गुन्ह्यातील लोक पकडले जात नाहीत. यावेळी त्यांनी विरोधकांवर 30 वर्षांपासून पाकिस्तानला लुटल्याचा आरोपही केला. जनरल मुशर्रफ यांनी देशावर जे अत्याचार केले, या चोरांना एनआरओ दिले, त्यामुळे आज आपण अडचणीत आहोत. संधी मिळेल तेव्हा ते सरकार पाडण्याचा प्रयत्न करत आहेत, पण माझे सरकार गेले तरी माझा जीव गेला, मी त्यांना कधीच माफ करणार नाही.
इम्रानविरोधात अविश्वास प्रसातव
पाकिस्तानातील इम्रान खान सरकारविरोधात विरोधकांनी अविश्वास प्रस्ताव आणला असून त्यावर उद्या मतदानाची तारीख निश्चित करण्यात आली आहे. 8 मार्च रोजी नॅशनल असेंब्ली सचिवालयात विरोधी पक्षांनी अविश्वास प्रस्तावाची नोटीस दिल्यानंतर पाकिस्तानमध्ये राजकीय आंदोलन वाढले आहे. पंतप्रधान इम्रान खान यांच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ (पक्ष) देशातील आर्थिक संकट आणि वाढत्या महागाईला जबाबदार असल्याचा आरोप नोटिशीत करण्यात आला आहे.
असे आहे राजकीय समीकरण
इम्रान खान आघाडी सरकारचे नेतृत्व करत आहेत. इम्रान खानचे मित्रपक्ष त्यांच्यापासून दूर आहेत, तर त्यांच्या पक्षाचे सुमारे दोन डझन खासदार त्यांच्या विरोधात बंड करत आहेत. 69 वर्षीय इम्रान खान यांच्या पक्षाचे 342 सदस्यीय नॅशनल असेंब्लीमध्ये 155 सदस्य आहेत आणि सरकारमध्ये राहण्यासाठी त्यांना किमान 172 खासदारांचा पाठिंबा आवश्यक आहे.