Imran Khan : पाकिस्तानचा निर्णय रविवारी होणार, राजीनामा देणार नाही...! देशाला संबोधित करताना इम्रान थेट बोलले
By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2022 09:52 PM2022-03-31T21:52:14+5:302022-03-31T21:53:00+5:30
इम्रान म्हणाले, ना मी झुकणार, ना माझ्या समाजाला झुकू देणार. पाकिस्तान दहशतवादाच्या विरोधात आहे. मला भारत अथवा इतर कुणाचाही विरोध नको आहे....
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान आज देशाला संबोधित करत आहेत. आपल्या भाषणादरम्यान ते म्हणाले, आज पाकिस्तानसाठी निर्णय घेण्याची वेळ आली आहे. आज मी देशासोबत लाईव्ह बोलत आहे. पाकिस्तान माझ्यापेक्षा केवळ पाच वर्षांनी मोठा आहे. आपण येथली पहिली पिढी आहोत.
यावेळी बोलताना इम्रान म्हणाले, पाकिस्तानचा निर्णय रविवारी होईल. संसदेत मतदान होईल आणि पाकिस्तानात सत्तेवर कोण विराजमान होणार, हे ठरेल. पण, इम्रान राजीनामा देईल, असे जे म्हणत आहेत, त्यांनी हे लक्षात ठेवावं, की इम्रान शेवटच्या चेंडूपर्यंत मैदानात उभा राहिला आहे आणि खंबीरपणे उभा राहील.
इम्रान खान म्हणाले, अमेरिकेसोबत जाणे ही मुशर्रफ यांची मोठी चूक होती. मी मुक्त परराष्ट्र धोरणाच्या बाजूने आहे. पाकिस्तान अमेरिकेच्या सोबतीने लढला आणि त्यांनीच निर्बंध लादले. मला भारत अथवा इतर कुणाचाही विरोध नको आहे, असेही इम्रान म्हणाले.
इम्रान म्हणाले, ना मी झुकणार, ना माझ्या समाजाला झुकू देणार. पाकिस्तान दहशतवादाच्या विरोधात आहे. पाकिस्तानच्या आदिवासी भागांबद्दल बोलताना ते म्हणाले की त्यांना आदिवासी भाग इतरांपेक्षा अधिक चांगला माहित आहेत.