Imran Khan: पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी परदेशातून मिळालेले गिफ्ट विकले?
By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2021 02:22 PM2021-10-21T14:22:52+5:302021-10-21T14:24:23+5:30
Imran Khan: पाकिस्तानातील आर्थिक संकट आणि महागाईवरुन इम्रान खान सरकारवर विरोधकांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. आता इम्रान खान यांना परदेशातून मिळालेल्या गिफ्ट्सच्या बाबतीत वाद निर्माण झाला आहे.
Imran Khan: पाकिस्तानातील आर्थिक संकट आणि महागाईवरुन इम्रान खान सरकारवर विरोधकांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. आता इम्रान खान यांना परदेशातून मिळालेल्या गिफ्ट्सच्या बाबतीत वाद निर्माण झाला आहे. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांची कन्या मरियम नवाज यांनी इम्रान खान यांच्यावर घणाघाती आरोप केला आहे. इम्रान खान यांनी इतर देशांकडून मिळालेले गिफ्ट्स विकून टाकले आहेत, असा ट्विट मरियम यांनी केलं आहे.
पीएमएल-एनच्या उपाध्यक्ष मरियम नवाज यांनी उर्दूत एक ट्विट केलं आहे. यात त्यांनी इम्रान खान यांच्यावर निशाणा साधला आहे. "इम्रान खान यांनी परदेशातून मिळालेले गिफ्ट्स विकून टाकले आहेत. एका बाजूला खलीफा हजरत उमर (पैगंबर मोहम्मद यांचे साथीदार) आपल्या कमीजचा देखील हिशोब द्यायचे आणि एका बाजुला तुम्ही (इम्रान खान) देशाच्या तिजोरीतून सर्व गिफ्ट्स विकून टाकत आहेत. तुम्ही कशाच्या जोरावर मदीनेसारखा देश निर्मितीची भाषा करता? एखादा व्यक्ती इतका असंवेदनशील, बहिरा, मुका आणि आंधळा कसा असू शकतो?", अशा आशयाचं ट्विट मरियम यांनी केलं आहे.
पीडीएमनंही साधला इम्रान खान यांच्यावर निशाणा
विरोधी पक्षाच्या भूमिकेतील पाकिस्तान डेमोक्रॅटिक मूव्हमेंटचे (PDM) प्रमुख मौलाना फजलुर रहमान यांनीही पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर निशाणा साधला आहे. "पंतप्रधान इम्रान खान यांनी एका प्रिन्सकडून मिळालेलं महागडं घड्याळ विकल्याची माहिती समोर आली आहे. सोशल मीडियावर याबाबतच्या बातम्या येत आहेत. यात आखाती देशातील एका राजकुमारानं खान यांना १० लाख डॉलर्सचं महागडं घड्याळ गिफ्ट दिलं होतं. इम्रान खान यांनी दुबईतील त्यांच्या एका जवळच्या व्यक्तीला ते घड्याळ १० लाख डॉलरला विकल्याचं सांगितलं जात आहे. जर हे खरं असेल तर ही अतिशय शरमेची बाब आहे", असं मौलाना फजलुर रहमान म्हणाले.
पाकिस्तानच्या गिफ्ट डिपॉझिटरी नियमांनुसार देशाच्या सर्वोच्च नेत्याला मिळणारे गिफ्ट्स देशाची संपत्ती मानले जातात. यासोबतच त्यांचा लिलाव करण्याचीही परवानगी नाही. पाक नियमानुसार कोणताही अधिकारी त्याला मिळालेल्या गिफ्टपैकी १० हजाराखालील किमतीची वस्तू स्वत:सोबत ठेवू शकतो. पण त्यापेक्षी अधिक किमतीची गिफ्ट्स सरकारी तिजोरीत जमा केले जातात.