Imran Khan: मैं झुकेगा नहीं! शेवटपर्यंत लढणार, काही झाले तरी राजीनामा देणार नाही; इम्रान खानचा निर्धार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2022 09:55 PM2022-03-23T21:55:27+5:302022-03-23T21:56:36+5:30
मी शेवटच्या चेंडूपर्यंत खेळेन आणि आधीपासून दडपणाखाली असलेल्या विरोधी पक्षाला धक्का देईन, असा एल्गार इम्रान खान यांनी केला आहे.
इस्लामाबाद: आताच्या घडीला पाकिस्तानात राजकीय उलथापालथ सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांना पाकिस्तानी लष्कराने राजीनामा देण्यास सांगितले आहे. इम्रान खान यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे. यानंतर आता नवीन पंतप्रधान कोण असेल अशी चर्चा सुरु झाली आहे. मात्र, इम्रान खान यांनी काही झाले तरी राजीनामा देणार नाही, शेवटपर्यंत लढणार असल्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
इस्लामाबाद येथे पत्रकारांशी बोलताना, मी कोणत्याही परिस्थितीत राजीनामा देणार नाही. मी शेवटच्या चेंडूपर्यंत खेळेन आणि एक दिवस आधीपासून दडपणाखाली असलेल्या विरोधी पक्षाला धक्का देईन, असे इम्रान खान यांनी ठणकावून सांगितले आहे. माझ्याकडे एक ट्रम्प कार्ड आहे, जे अद्याप बाहेर काढलेले नाही, असा दावा इम्रान खान यांनी केला आहे.
अविश्वास प्रस्ताव आणला जाणार
विरोधकांनी इम्रान खान यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव आणला असून, तो २५ मार्च रोजी नॅशनल असेंब्लीमध्ये मांडला जाणार आहे. नॅशनल असेंब्लीच्या नियमांनुसार, अविश्वास प्रस्तावावर ३ दिवसांनी आणि तो मांडल्यानंतर ७ दिवसांत मतदान घेतले जाईल. यावेळी इम्रान खान यांची खुर्ची जाणार असल्याचे दिसत आहे. त्यांच्याच पक्षाचे काही खासदार बंडखोरी करण्याच्या तयारीत आहेत. याशिवाय लष्करप्रमुख जनरल बाजवा यांनी इम्रान खान यांना राजीनामा देण्यास सांगितल्याचेही सांगितले जात आहे.
दरम्यान, पाकिस्तानचे पुढील पंतप्रधानाचे नाव माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्या पक्षाने म्हणजेच पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाझने जाहीर केले आहे. नवाज शरीफ यांची मुलगी मरियम नवाझ यांनी शहबाज शरीफ पंतप्रधानपदाचा उमेदवार बनविण्याचा निर्णय घेतला आहे. याचबरोबर इम्रान खान यांच्या विरोधातील अविश्वास प्रस्ताव पारित करण्यास सफल होण्याची आशा व्यक्त केली आहे.