पाकिस्ताननं चपलांवर छापले 'ओम', हिंदू भडकले
By admin | Published: June 20, 2016 06:06 PM2016-06-20T18:06:12+5:302016-06-20T18:06:12+5:30
पाकिस्तानातल्या सिंध प्रांतात ओम अक्षर छापलेल्या चपला बाजारात विकल्या जात असल्यानं मोठं वादंग माजलं आहे.
ऑनलाइन लोकमत
इस्लामाबाद, दि. 20 - पाकिस्तानातल्या सिंध प्रांतात ओम अक्षर छापलेल्या चपला बाजारात विकल्या जात असल्यानं मोठं वादंग माजलं आहे. सिंध प्रांतातील हिंदू जनसमुदायानं या चपलांवर तात्काळ बंदी घालण्याची मागणी केली आहे. या चपलांमुळे हिंदूंच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत, अशी भावना इथल्या हिंदूंनी व्यक्त केली आहे, असं वृत्त इंडिया टुडेनं दिलं आहे.
सिंध प्रांतातल्या टांडो आंदम शहरात या ओम अक्षर छापलेल्या चपला खुलेआम बाजारात विकल्या जात असल्यानं तिथल्या हिंदूंनी त्याचा तीव्र निषेध व्यक्त केला आहे. आंदोलकांनी ओम छापलेल्या चपला विकणा-या दुकानदारांवर कारवाईची मागणी केली आहे. तर वितरकांना या चपला विकू नये, असा सल्ला दिला आहे. पाकिस्तान हिंदू काऊन्सिल(पीएचसी)नं या चपलांवर तात्काळ बंदी घालण्याची मागणी केली आहे.