Pakistan: 'जय श्री राम आणि हर हर महादेव'च्या घोषणेसह कराचीत मंदिर तोडफोडीविरोधात हिंदूंची निदर्शने
By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2021 04:19 PM2021-08-09T16:19:21+5:302021-08-09T16:22:26+5:30
पाकिस्तानच्या कराचीमध्ये राहणाऱ्या अल्पसंख्यांकांनी रविवारी सातत्याने होणाऱ्या अत्याचाराविरोधात निदर्शने केली.
कराची:पाकिस्तानच्या रहिम यार खान भागातील मंदिरात नुकत्याच झालेल्या तोडफोडीच्या घटनेनंतर तेथे राहणाऱ्या हिंदू समाजातील लोकांचा संताप चांगलाच वाढला आहे. दरम्यान, पाकिस्तानातील कराची येथे राहणाऱ्या हिंदू अल्पसंख्याकांनी रविवारी सातत्याने होणाऱ्या अत्याचाराविरोधात निदर्शनं केली. या दरम्यान, कराचीमध्ये 'जय श्री राम' आणि 'हर हर महादेव' च्या घोषणा दिल्या गेल्या.
रविवारी कराचीच्या प्रेस क्लबबाहेर अल्पसंख्यांक हिंदू समुदायाचे लोक आंदोलनात सहभागी झाले होते. हिंदू समुदायाशिवाय, शीख, पारशी, ख्रिश्चन आणि इतर वर्गातील लोकही होते. यावेळी जमलेल्या लोकांनी नुकत्याच झालेल्या मंदिरातील तोडफोडीच्या घटनेचा निषेध केला आणि अल्पसंख्यांकांवरील अत्याचाराविरोधात आवाज उठवला. यावेळी आंदोलकांनी हर हर महादेव, जय श्री रामच्या घोषणा देण्यासोबतच भगवे झेंडे फडकवत 'आम्हाला न्याय हवा' या शब्दांसह फलकही लावले.
काय म्हणाले आंदोलक ?
कराचीतील प्रसिद्ध प्राचीन हनुमान मंदिराचे मुख्य पुजारी रामनाथ मिश्रा महाराज हेही विरोध प्रदर्शनात सहभागी झाले होते. रहिम यार खानमध्ये गुंडांनी ज्या प्रकारे गणेश मंदिराची तोडफोड केली, त्याचा आम्ही तीव्र निषेध करतो. ज्याप्रमाणे इस्लाममध्ये धर्माच्या विरोधात वाईट कृत्ये करणाऱ्यांना फाशी किंवा जन्मठेपेची शिक्षा दिली जाते, त्याचप्रमाणे आपल्या धर्माविरुद्ध वाईट कृत्य करणाऱ्यांना शिक्षा झाली पाहिजे. अलीकडे पाकिस्तानमध्ये हिंदूंवरील अत्याचार वाढले आहेत, असे ते यावेळी म्हणाले.
भारतात हिंदू-मुस्लिम शांततेन राहतात
यावेळी कराचीचे मुफ्ती फैसलही या निदर्शनात सहभागी झाले होते. ते म्हणाले की, मी मुस्लिम आहे, पण समाजांमध्ये द्वेष निर्माण करणारे प्रसंग घडू नये, असं मला वाटतं. आजही भारताच्या आत मुस्लिम अल्पसंख्यांक आहेत, आपले अनेक नातेवाईक भारताच्या विविध शहरांमध्ये राहतात आणि तेथे सर्वजण आनंदी आहेत, असं ते म्हणाले.
काय आहे प्रकरण
पाकिस्तानमधील रहीम यार खान भागात एका गणेश मंदिराची तोडफोड करण्यात आली होती. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर बराच वाद झाला. पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खान यांनीही घटनेचा निषेध केला होता, तर पाकिस्तानी सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक पोलिस अधिकाऱ्यावर कारवाई केली होती.