Corona Vaccination: अजबगजब निर्णय! कोरोना लस घेतली नाही तर मोबाईलचं सिमकार्ड ब्लॉक करणार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2021 12:27 PM2021-06-11T12:27:33+5:302021-06-11T12:28:46+5:30
Ary News रिपोर्टनुसार, पंजाब प्रांतातील सरकारनं हा निर्णय आरोग्यमंत्री डॉ. यासमीन रशीद याच्या अध्यक्षतेखाली झालेल्या लाहौर येथील बैठकीत घेतला आहे.
पाकिस्तान(Pakistan) च्या लोकांमध्ये कोरोना लसीबाबत अनेक शंका आहे. त्यामुळे लस घेण्यापासून लोक पळ काढत आहेत. त्यामुळे आता स्थानिक सरकारनं लोकांना कोरोना लस घ्यावी यासाठी अजबगजब निर्णय घेत दबाव टाकण्यास सुरूवात केली आहे. पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात लस न घेणाऱ्यांचे सीमकार्ड ब्लॉक(Sim Card Block) करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
Ary News रिपोर्टनुसार, पंजाब प्रांतातील सरकारनं हा निर्णय आरोग्यमंत्री डॉ. यासमीन रशीद याच्या अध्यक्षतेखाली झालेल्या लाहौर येथील बैठकीत घेतला आहे. या निर्णयानं लोक कोरोना लस घेण्यासाठी पुढे येतील असा विश्वास नेत्यांना वाटतं. जे आतापर्यंत लस घेण्यापासून पळत होते त्यांनी लस घ्यावी यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
पंजाब प्रांतातील आरोग्यमंत्री म्हणाले की, कोरोना रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत असताना लसीकरण मोठ्या प्रमाणात होणं गरजेचे आहे. परंतु तसं होत नाही. पंजाब प्रांतात कोरोना लस घेण्यापासून नागरिक पळ काढत आहेत. त्यामुळे लसीकरण मोहीम यशस्वीरित्या राबवण्यात यश येत नाही. राज्यातील ३ लाख लोक असे आहेत ज्यांनी लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर आता दुसरा डोस घेण्यासाठी आलेच नाहीत. त्यामुळे सरकारची डोकेदुखी वाढली आहे त्यामुळेच सरकारने अजबगजब निर्णय घेतला आहे.
"कोरोनाची लस सगळ्यांना देण्याची गरज नाही" #coronavirus#vaccine#NarendraModihttps://t.co/LijOlBKVWq
— Lokmat (@MiLOKMAT) June 11, 2021
काहीजण कोरोना संक्रमित झाल्यानं दुसरा डोस घेत नाहीत
पाकिस्तानच्या आरोग्य मंत्रालयाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, ज्या लोकांनी कोरोना लसीचा दुसरा डोस वेळेत घेतला नाही अशा लोकांची यादी तयार केली जात आहे. यातील काही जणांचा दुसरा डोस घेण्यापूर्वीच मृत्यू झाला आहे. कोरोना लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर काही जण कोरोना संक्रमित झाले होते. त्यानंतर अनेकांनी कोरोना लस न घेण्याचं ठरवलं. दुसरा डोस वेळेत घेणे गरजेचे आहे परंतु ते डोस घेत नाहीत. त्यामुळे ज्या लोकांनी लस घेतली नाही त्यांच्यामध्येही लसीबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.
पाकिस्तानात आतापर्यंत ९५ लाखापेक्षा जास्त लस दिली
यापूर्वी पाकिस्तानच्या सिंध प्रांत सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांनी लस घेतली नाही तर त्यांचा पगार स्थगित केला होता. सिंधचे मुख्यमंत्री मुराद अली शहा यांनी अधिकाऱ्यांना अशा कर्मचाऱ्यांची यादी तयार करण्याचे आदेश दिले होते. पाकिस्तानात आतापर्यंत ९५ लाखापेक्षा जास्त कोरोनाची लस दिली आहे. म्हणजे केवळ २५.३ लाख लोकांनी लस घेतलीय. २१ कोटी लोकसंख्या असलेल्या देशात तुलनेने हे प्रमाण कमी आहे. त्यामुळे सरकारची चिंता वाढली आहे.