आता तोफा किंवा हवाई मार्गे नव्हे, तर अण्वस्त्र युद्ध करू, पाकच्या मंत्र्याची भारताला धमकी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2019 09:38 AM2019-10-22T09:38:52+5:302019-10-22T09:39:13+5:30
भारतानं पाकव्याप्त काश्मीरमध्ये केलेल्या कारवाईनंतर पाकिस्तान सैरभैर झाला आहे.
इस्लामाबाद- भारतानं पाकव्याप्त काश्मीरमध्ये केलेल्या कारवाईनंतर पाकिस्तान सैरभैर झाला आहे. पाकिस्तानमधले रेल्वे मंत्री शेख रशीद यांनी पुन्हा एकदा भारताला अण्वस्त्र युद्धाची धमकी दिली आहे. आता दोन्ही देशांमध्ये तोफा आणि रणगाड्यांनी नव्हे, तर अण्वस्त्र युद्ध होईल. शेख रशीद यांनी एका पत्रकार परिषदेत ही धमकी दिली. भारत आणि पाकिस्तानदरम्यान सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर ते म्हणाले, त्या देशाला ही सरळ आणि गंभीर धमकी आहे. आता युद्ध झालं तर ते नेहमीसारखं नसेल, त्यांना वाटतं युद्ध झालं, तर 4 ते 6 दिवस रणगाडे आणि तोफा किंवा लढाऊ विमानांनी हल्ला करू, नौदलाच्या मदतीनं हल्ला करू, परंतु असं अजिबात होणार नाही, आता सरळ सरळ आण्विक युद्ध होणार आहे.
125-250 ग्रॅमचे आण्विक बॉम्ब
पाकिस्तानचे रेल्वेमंत्री शेख रशीद यांनी भारताला आण्विक युद्धाची धमकी दिली. जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवून विशेष राज्याचा दर्जा संपवल्यानंतर रशीद यांनी वादग्रस्त विधान केलं होतं. रशीद म्हणाले, पाकिस्तानजवळ 125-250 ग्रॅम आण्विक बॉम्ब आहेत. जे एका ठरावीक शहराला लक्ष्य करू शकतात.
युद्धाच्या तारखेची केली होती घोषणा
तत्पूर्वी रेल्वे मंत्री शेख रशीद यांनी ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात भारत-पाकिस्तानदरम्यान युद्धाची घोषणा केली होती. त्यानंतर त्यांची खिल्ली उडवण्यात आली होती. पाकिस्तानमध्ये एका रॅलीदरम्यान भाषण देताना ते म्हणाले, मोदी आम्हाला तुमची वृत्ती माहीत आहे. त्यानंतर पाकिस्तानच्या लोकांनीच रशीदचे व्हिडीओ व्हायरल केले होते.