पाकने ब्रिक्स जाहीरनामा फेटाळला, अतिरेक्यांना संरक्षण देत नसल्याचा दावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2017 02:49 AM2017-09-06T02:49:59+5:302017-09-06T02:50:26+5:30
आपल्या भूभागावर दहशतवाद्यांसाठी सुरक्षित ठिकाण नसल्याचा दावा करीत पाकिस्तानने मंगळवारी चीनचा समावेश असलेल्या ब्रिक्स परिषदेचा दहशतवादविरोधी जाहीरनामा फेटाळला आहे.
इस्लामाबाद : आपल्या भूभागावर दहशतवाद्यांसाठी सुरक्षित ठिकाण नसल्याचा दावा करीत पाकिस्तानने मंगळवारी चीनचा समावेश असलेल्या ब्रिक्स परिषदेचा दहशतवादविरोधी जाहीरनामा फेटाळला आहे. दहशतवादी गटांवर कारवाईसाठी आंतरराष्टÑीय दबाव वाढत असतानाही पाकिस्तानने आपला हेका कायम ठेवला आहे.
चीनच्या शीयामेन शहरात सोमवारी ब्राझील, रशिया, भारत, चीन, दक्षिण आफ्रिका या देशांनी ब्रिक्स शिखर परिषदेत सर्व प्रकारच्या दहशतवादाची निंदा करणारा ४३ पानी जाहीरनामा जारी केला होता. पाकिस्तानसह अन्य देशांमधील दहशतवादी गटांपासून असलेल्या धोक्याबाबत चिंताही व्यक्त केली होती.
तालिबान, इस्लामिक स्टेट (इसिस), अल-कायदा, पूर्व तुर्किस्तान, उझबेकिस्तानमधील इस्लामी चळवळ तसेच हक्कानी नेटवर्क, लष्कर-ए- तोयबा, जैश-ए- मोहम्मद, तेहरिक- तालिबान पाकिस्तान, हिज्ब-उत- तहरीर या अतिरेकी गटांनी चालविलेल्या हिंसाचारामुळे उपखंडातील सुरक्षेला निर्माण झालेल्या धोक्याचा उल्लेखही या जाहीरनाम्यात करण्यात आला होता.
अफगाणिस्तानकडे अंगुलीनिर्देश...
अतिरेक्यांसाठी अफगाणिस्तानातील ४० टक्के भूभाग सुरक्षित असल्याचे सांगत पाकिस्तानचे संरक्षण मंत्री खुर्रम दस्तगीर यांनी उपखंडातील हिंसाचारासाठी अफगाणिस्तानमधील दहशतवादी गटांना जबाबदार धरले. ब्रिक्स सदस्यांनी जारी केलेला जाहीरनामा आम्ही फेटाळत आहोत, असे त्यांनी संरक्षण स्थायी समितीच्या बैठकीत म्हटले. काही गट देश सोडून गेले त्यांचा अपवाद वगळता पाकिस्तानने आपल्या भूमीवरील सर्व दहशतवादी गटांवर कारवाया केल्या आहेत, असा दावा दस्तगीर यांनी केल्याचे वृत्त जीईओ टीव्हीने दिले आहे.