पाकमधील बलुचिस्तानमध्ये पुन्हा दहशतवादी हल्ला, 4 पोलिसांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2019 01:03 PM2019-05-14T13:03:33+5:302019-05-14T13:09:42+5:30
पाकिस्तानातील बलुचिस्तान येथे सोमवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये 4 पोलिसांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तर या हल्ल्यात 11 जण जखमी झालेत
कराची - पाकिस्तानातील बलुचिस्तान येथे सोमवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये 4 पोलिसांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तर या हल्ल्यात 11 जण जखमी झालेत. बलुचिस्तानची राजधानी क्वेटा येथे मस्जिदीत नमाज पठण करण्यासाठी लोकं जमली होती. त्यावेळी मोठा बॉम्बस्फोट झाला. हा ब्लास्ट रिमोट कंट्रोलच्या साहय्याने करण्यात आला. मागील तीन दिवसांतील हा दुसरा मोठा दहशतवादी हल्ला आहे.
क्वेटामधील उपनिरिक्षक जनरल रज्जाक चीमा यांनी या हल्ल्याची खातरजमा करताना सांगितले की, आमचे पोलीस कर्मचारी मस्जिदीजवळ संरक्षणासाठी तैनात होते. त्यावेळी तिथे अचानक बॉम्बस्फोट झाला. त्यामध्ये रॅपिड एक्शन फोर्सच्या कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. तसेच या हल्ल्यात जखमी झालेले पोलीस कर्मचारी गंभीररित्या जखमी आहेत. हा बलुचिस्तानमधील मागील तीन दिवसांतील दुसरा हल्ला आहे. याआधी शनिवारी ग्वादर येथे दहशतवाद्यांनी एका अलिशान हॉटेलला लक्ष्य केलं होतं. त्यामध्ये 8 जणांचा मृत्यू झाला होता. मृतांमध्ये पाकिस्तानी नौदलचा जवान आणि तीन दहशतवाद्यांचा समावेश होता.
मस्जिदीत झालेला हा हल्ला दहशतवाद्यांनी विस्फोटकांनी भरलेल्या मोटारसायकलच्या मदतीने घडवून आणला. ज्याला रिमोट कंट्रोलच्या साहय्याने कंट्रोल करण्यात आलं होतं. स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार ही मोटारसायकल मस्जिदीजवळ ठेवण्यात आली होती. मोटारसायकल पार्किंग करुन दहशतवाद्यांनी त्याठिकाणाहून पळ काढला. हा बॉम्बस्फोट इतका भयंकर होता की स्फोटाच्या आवाजाने आजुबाजूच्या इमारतींच्या काचा फुटल्या.
रिपोर्टनुसार बंदी असलेल्या तहरीक-ए-तालिबानने पाकिस्तानात झालेल्या या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी या हल्ल्याचा निषेध केला आहे. तसेच बॉम्बस्फोटाच्या घटनेची सखोल तपासणी करुन अहवाल देण्याचे आदेश दिले आहेत. पाकिस्तानात दहशतवादी कृत्यांना आळा घालण्यासाठी सर्वोत्तापरी प्रयत्न करणार असल्याचं पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांनी सांगितले. रमजानचा महिना असताना निर्दोष लोकांवर हल्ला करणाऱ्यांचा कोणताही धर्म नसतो. बलुचिस्तानचे मुख्यमंत्री जाम कमाल यांनीही या घटनेचा निषेध केला आहे.