वाईट प्रतिमेसाठी स्वतः पाकिस्तानच जबाबदार - मलाला
By admin | Published: April 15, 2017 04:55 PM2017-04-15T16:55:41+5:302017-04-15T17:15:37+5:30
नोबेल पुरस्कार विजेती मलाला युसुफझाईने जागतिक पातळीवर पाकिस्तानची वाईट प्रतिमा होण्यासाठी तेथील स्थानिक नागरिकांनाच जबाबदार ठरवले आहे.
Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 15 - नोबेल पुरस्कार विजेती मलाला युसुफझाईने जागतिक पातळीवर पाकिस्तानची वाईट प्रतिमा होण्यासाठी तेथील स्थानिक नागरिकांनाच जबाबदार ठरवले आहे. ईश्वरनिंदा केली म्हणून पाकिस्तानमध्ये एका विद्यार्थ्याला अमानुष मारहाण करण्यात आली. इतकी बेदमी मारहाण केली यात त्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. या घटनेसंदर्भातच बोलताना मलालानं पाकिस्तानवर ही टीका केली आहे. जगभरात पाकिस्तानचे नाव खराब होण्याला दुसरे कोणी नाही तर स्वतः पाकिस्तानच जबाबदार आहे, असे वक्तव्य तिनं केले आहे.
एका व्हिडीओद्वारे मलालाने आपले म्हणणं लोकांपुढे मांडले आहे. "इस्लाम आणि पाकिस्तानला कशाप्रकारे बदनाम केले जात आहे, याची आपण चर्चा करतो. कुणीही आपल्या देशाला व धर्माला बदनाम करत नाही. पाकिस्तानची प्रतिमा खराब होण्यास पाकिस्तानातीलच लोकं जबाबदार आहेत. देशाचं नाव खराब करण्यासाठी आपण समर्थ आहोतच, अशी खोचक टीका मलालाने या व्हिडीओद्वारे केली आहे.
गुरुवारी पत्रकारितेचा अभ्यास करणाऱ्या 23 वर्षांच्या मशाल खान या विद्यार्थ्याला जमावाने मारहाण केली. त्याने ईश्वरनिंदा करणारी एक पोस्ट फेसबुकवर टाकली होती. बेदम मारहाण केल्यानंतर त्याला गोळी घालण्यात आली. हे कृत्य इथंवरच थांबलं नाही तर त्याच्या मृतदेहाचीही विटंबना करण्यात आली होती.
या घटनेसंदर्भातच मलालानं पाकिस्तानवर कठोर शब्दांत टीका केली आहे. मशालच्या वडिलांसोबत मलालानं संपर्क साधला. मुलाची हत्या झाल्यानंतरही त्याचे वडील देशात सहिष्णुता व शांतता निर्माण व्हावी, अशी प्रार्थना करत असल्याचे मलालाने सांगितले. ही गोष्ट केवळ मशालच्या मृत्यूची नाही तर इस्लामच्या संदेशाचीदेखील ही हत्या आहे. आपण आपला धर्म, मूल्ये आणि चांगली वागणूक विसरलो आहोत, असंही मलालानं यावेळी म्हटले आहे.
मलाला पुढे असंही म्हणाली, "पाकिस्तानातील लोकांनी इस्लामचा अभ्यास करण्याची आवश्यकता आहे. कारण इस्लाम धर्म शांती आणि सहिष्णुतेचा संदेश देणार आहे. प्रत्येक पाकिस्तानी नागरिकाला सुरक्षित जगण्याचा अधिकार आहे. जर अशा प्रकारे लोकांची हत्या होऊ लागली तर येथे कुणीच सुरक्षित राहणार नाही", अशी खंत मलालाने व्यक्त केली आहे.
पाकिस्तानातील धोरण निर्मात्यांना आणि राजकीय पक्षांनी अशा घटना पुन्हा होऊ न देण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, तेव्हाच मशालच्या कुटुंबीयांना न्याय मिळेल, असे मतही मलालानं व्यक्त केले आहे.