पाक व्हेंटिलेटरवर! जीवनावश्यक औषधांसाठी भारताकडे विनवणी; व्यापार बंदीनंतर आली नामुष्की
By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2019 04:14 PM2019-09-03T16:14:23+5:302019-09-03T16:25:47+5:30
पाकिस्तानने मंगळवारी भारतातून जीवनावश्यक औषधांची आयात करण्याला मंजूरी दिली आहे.
नवी दिल्ली - जम्मू काश्मीरमधून कलम 370 हटविल्यानंतर बिथरलेल्या पाकिस्ताननेभारतासोबत व्यापार संबंध तोडले होते. मात्र त्यांचा हा निर्णय पाकिस्तानच्या अंगलट आल्याचं दिसून आलं आहे. व्यापार बंदीला एक महिना झाला तोवर पाकिस्तान भारतासमोर झुकला आहे. जीवनावश्यक औषधांच्या कमतरतेनंतर पाकिस्तानने मंगळवारी भारतातून अंशत: व्यापारावरील बंदी उठविली आहे.
पाकिस्तानने मंगळवारी भारतातून जीवनावश्यक औषधांची आयात करण्याला मंजूरी दिली आहे. पाकिस्तान भारताला फळे, सिमेंट, खनिज, चमड्याच्या वस्तू. रबर, अल्कहोल पेय, चिकित्सा उपकरण या प्रकारच्या अनेक वस्तू निर्यात करतं. तर भारत पाकिस्तानला जैविक रसायन, प्लास्टिक उत्पादन, धान्य, साखर, कॉफी, चहा, लोह आणि स्टीलचे सामान, औषधे इ. वस्तू निर्यात करते.
पाकिस्तान मोठ्या प्रमाणात भारताकडून औषधे आयात करते. या जीवनावश्यक औषधात साप, कुत्रा यांच्या विषापासून वाचवण्याचं औषधासाठी पाकिस्तानला भारतावर निर्भर राहावं लागतं. जुलै महिन्यात आलेल्या रिपोर्टनुसार पाकिस्तानने 16 महिन्याच्या कालावधी भारताकडून 250 कोटींहून अधिक किमतीचा व्यापार विषापासून वाचविणाऱ्या औषधांवर केला होता. भारत आणि पाकिस्तान यांच्यात 2017-18 मध्ये 2.4 अरब डॉलर व्यापार झाला होता. द्विपक्षीय व्यापारात जवळपास 80 टक्के भाग पाकिस्तानमध्ये भारतीय निर्यात वस्तूंचा असतो.
काश्मीरमधून कलम 370 हटविण्याच्या निर्णयानंतर सैरभैर पाकिस्तानने भारतासोबत व्यापार करण्यास बंदी घातली होती. मात्र त्यांचा हा निर्णय महिनाभरही टिकला नाही. औषधांच्या कमतरतेमुळे त्यांना नाईलाजाने भारतासोबत अंशत: व्यापार बंदी उठवावी लागली आहे.
पाकच्या मंत्र्यांपासून ते पंतप्रधान इम्रान खान यांच्यापर्यंत अनेकजण भारतासोबत युद्धाची भाषा बोलू लागलेत. तर जगाने काश्मीरकडे लक्ष दिले नाही तर भारत-पाक युद्धाचे परिणाम जगाला भोगावे लागतील अशा पोकळ धमक्या पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान देत आहेत. संयुक्त राष्ट्र संघातही पाकिस्तानला तोंडघशी पडावे लागले होते. चीनशिवाय इतर कोणत्याही देशांनी पाकिस्तानला पाठिंबा दिला नाही इतकचं काय तर अण्वस्त्र युद्धाची भाषाही पाकिस्तानचे मंत्री बोलू लागले. पण आर्थिक स्थिती इतकी ढासळली असताना पाकिस्तानची खुमखुमी कमी होताना दिसत नाही. अखेर भारतासोबत द्विपक्षीय व्यापारावरील अंशत: बंदी उठविण्याची वेळ पाकिस्तानवर आली आहे.