Pakistan: पाकिस्तानच्या दुसऱ्या सर्वात मोठ्या नौदल एअरबेसवर दहशतवादी हल्ला, प्रत्युत्तरात चार दहशतवादी ठार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2024 07:59 AM2024-03-26T07:59:11+5:302024-03-26T08:00:00+5:30
Pakistan Naval Base Attack 4 terrorist killed: पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि नौदल हवाई तळावर सोमवारी रात्री दहशतवाद्यांनी हल्ला केला
Pakistan naval base attack: पाकिस्तानमधील बलुचिस्तान प्रांतात तुर्बत आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि नौदल हवाई तळावर सोमवारी रात्री दहशतवाद्यांनी हल्ला केला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, पाकिस्तानी सुरक्षा दलांनी नौदल एअरबेसवरील हल्ला रोखला. यावेळी त्यांनी चार दहशतवाद्यांना ठार केले. त्यासोबतच तुर्बतमधील पाकिस्तानचे दुसरे सर्वात मोठे नौदल हवाई स्टेशन पीएनएस सिद्दीकीवर गोळ्यांनी हल्ला करण्यात आला. या परिसरात अनेक स्फोट झाले. यानंतर प्रतिबंधित बलुचिस्तान लिबरेशन आर्मी (BLA) च्या माजिद ब्रिगेडने तुर्बतमधील नौदल एअरबेसवर हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.
बलुचिस्तान प्रांतात चीनच्या गुंतवणुकीला माजिद ब्रिगेडचा विरोध आहे. चीन आणि पाकिस्तान या प्रदेशातील मालमत्तेचे शोषण करत असल्याचा आरोपही यात करण्यात आला आहे. द बलुचिस्तान पोस्टनुसार, बीएलएने दावा केला आहे की त्यांचे लढाऊ सैनिक एअरबेसमध्ये घुसले आहेत. याशिवाय या तळावर चिनी ड्रोनही तैनात आहेत. हल्ल्यानंतर जिल्हा आरोग्य अधिकारी केच यांनी टीचिंग हॉस्पिटल तुर्बतमध्ये आणीबाणी लागू केली, असून सर्व डॉक्टरांना तातडीने कामावर हजर राहण्यास सांगितले आहे.
तुर्बतमधील हा हल्ला बीएलए माजिद ब्रिगेडचा आठवड्यातील दुसरा आणि या वर्षातील तिसरा हल्ला आहे. यापूर्वी २९ जानेवारीला त्यांनी ग्वादरमधील लष्करी गुप्तचर मुख्यालय माच शहराला लक्ष्य केले. मग २० मार्चला तुर्बतमधील पाकिस्तानच्या दुसऱ्या सर्वात मोठ्या नौदल हवाई तळावर हल्ला केला, असे द बलुचिस्तान पोस्टने वृत्त दिले आहे. २० मार्च रोजी, पाकिस्तानमधील ग्वादर बंदर प्राधिकरण कॉम्प्लेक्समध्ये अनेक स्फोट आणि गोळीबार झाल्यानंतर सुरू झालेल्या लढाईत किमान दोन पाकिस्तानी सैनिक आणि आठ अतिरेकी मारले गेले.