भारतासमोर पाकिस्तान झुकला, चर्चेसाठी गुपचूप प्रस्ताव पाठवला
By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2018 08:29 PM2018-09-05T20:29:06+5:302018-09-05T20:29:22+5:30
पाकिस्तानी लष्कराने चार पावले मागे जात भारतासोबत चर्चा करण्यासाठी संपर्क साधला आहे.
इस्लामाबाद - आंतरराष्ट्रीय स्तरावर एकाकी पडल्याने पाकिस्तानची अर्थव्यवस्था संकटात सापडली आहे. अर्थव्यवस्थेचा कोसळता डोलारा सावरण्यासाठी पाकिस्तानी लष्कराने चार पावले मागे जात भारतासोबत चर्चा करण्यासाठी संपर्क साधला आहे. मिळालेल्या माहितीनुसार पाकिस्तानने चर्चेसाठी गुपचूप संपर्क साधला आहे. मात्र भारताकडून पाकिस्तानला फार उत्साहवर्धक प्रतिसाद मिळालेला नाही.
एक पाश्चिमात्य मुत्सद्दी आणि पाकिस्तानच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने यासंदर्भातील माहिती दिली आहे. न्यूयॉर्क टाइम्समध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार पाकिस्तानमधील सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी पाकिस्तानी लष्करप्रमुख कमर जावेद बाजवा यांच्याकडून अत्यंत गुपचूप पद्धतीने हा संपर्क साधण्यात आला होता. भारत आणि पाकिस्तानमधील द्विपक्षीय चर्चा 2015 पासून बंद असून, ती नव्याने सुरू करण्यासाठी हा संपर्क साधण्यात आला होता. दोन्ही देशांमधील व्यापारामधील अडथळे दूर करण्यासाठी पाकिस्तान भारतासोबत चर्चेसाठी प्रयत्नशील आहे.
दोन्ही देशांमधील व्यापार मुक्तपणे सुरू झाल्यास पाकिस्तानला भारतातील स्थानिक बाजारांमध्ये आपला माल पाटवणे शक्य होणार आहे. तसेच काश्मीरबाबत शांततेसाठी होणारी चर्चा द्विपक्षीय व्यापारालाही उत्तेजन देईल कारण परस्पर विश्वास निर्माण होण्यसाठी काश्मीर प्रश्नावरील चर्चा महत्त्वाची मानण्यात येते.
देशाची ढासळती अर्थव्यवस्था लष्करी शक्तीसाठी धोका ठरू शकते, त्यामुळे विद्रोही शक्तींना डोके वर काढण्यासाठी बळ मिळू शकते, जे मोठे आव्हान ठरू शकते, ही बाब पाकिस्तानी लष्कराला जाणवली आहे. त्यामुळेच त्यांनी चार पावले मागे येत भारतासोबत चर्चा करण्यासाठी तयारी केली असल्याचे सांगण्यात येत आहे. पाकिस्तान आपल्या अर्थव्यवस्थेची स्थिती सुधारण्यासाठी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीसाठी 9 अब्ज डॉलरची मदत मागणार आहे. पाकिस्तानवर चिनचे अनेक अब्ज डॉलरचे कर्ज असून, या कर्जाची परतफेड करण्यासाठी पाक प्रयत्नशील आहे.
दरम्यान, भारतासोबतच्या चर्चेबाबत प्रतिक्रिया देताना पाकिस्तानचे सूचना आणि प्रसारण मंत्री फवाद चौधरी यांनी सांगितले की, "त्यांचा देश आपल्या सर्व शेजारी देशांची चांगले संबंध निर्माण करू इच्छितो. पाकिस्तानला कमकुवत करून भारताचीही भरभराट होणार नाही, असे जनरल बाजवा यांचे म्हणणे आहे. त्यांनी पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेचा संबंध संरक्षणाशी जोडला होता."