शाहबाज पाकचे नवे ‘वझीर-ए-आझम’, पंतप्रधानपदी बिनविरोध निवड
By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2022 06:05 AM2022-04-12T06:05:33+5:302022-04-12T06:05:43+5:30
गेल्या आठवड्यापासून पाकिस्तानच्या राजकीय पटावर सुरू असलेले राजकीय नाट्य अखेरीस सोमवारी संपुष्टात आले.
इस्लामाबाद :
गेल्या आठवड्यापासून पाकिस्तानच्या राजकीय पटावर सुरू असलेले राजकीय नाट्य अखेरीस सोमवारी संपुष्टात आले. पंतप्रधान निवडीच्या प्रक्रियेवर इम्रान खान यांच्या पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ या पक्षाने बहिष्कार टाकल्याने पाकिस्तान मुस्लीम लीगचे (नवाझ) अध्यक्ष शाहबाज शरीफ यांची पंतप्रधानपदी बिनविरोध निवड झाली. पाकिस्तानच्या नॅशनल असेम्ब्लीच्या १७४ सदस्यांनी शरीफ यांच्या बाजूने मतदान केले.
इम्रान खान यांच्यावरील विश्वासदर्शक ठराव ऐनवेळी फेटाळण्यात आल्याने गेल्या आठवड्यापासून पाकिस्तानात राजकीय नाट्य सुरू होते. पाकिस्तानी सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणात मध्यस्थी करत इम्रान यांना नॅशनल असेम्ब्लीमध्ये शक्तिपरीक्षण करण्याचे निर्देश दिले होते. परंतु शनिवारी मध्यरात्रीनंतर राजकीय हालचालींना वेग येऊन इम्रान यांना पंतप्रधानपदावरून दूर करण्यात आले. पंतप्रधानपदासाठी शाहबाज शरीफ आणि इम्रान यांच्या पक्षाचे शाह मेहमूद कुरेशी यांच्यात स्पर्धा होती.
सोमवारी नॅशनल असेम्ब्लीमध्ये मतदानाला सुरुवात होण्यापूर्वीच इम्रान यांच्या पक्षाने या प्रक्रियेवर बहिष्कार टाकत असल्याचे जाहीर केले. त्यामुळे मतदानाला सुरुवात होण्यापूर्वीच तहरीक-ए-इन्साफच्या सर्व प्रतिनिधींनी सभात्याग केला आणि शाहबाज शरीफ यांच्या निवडीवर शिक्कामोर्तब झाले.
सभापतींचा गोंधळ
- नॅशनल असेम्ब्लीने शाहबाज यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्यानंतर त्यांच्या नावाची घोषणा करताना सभापती अयाज सादिक यांनी शाहबाज यांच्या नावाचा उच्चार नवाझ शरीफ असा केला.
- चूक लक्षात आल्यानंतर त्यांनी शाहबाज शरीफ असा उल्लेख केला.
वाईटावर चांगल्याचा विजय
चांगल्याने वाईटावर मिळवलेला हा विजय आहे. देशातील राजकारणात परकीय शक्ती हस्तक्षेप करत असल्याची इम्रान यांची बतावणी हे नाटक आहे. इम्रान यांच्या आरोपात थोडे जरी तथ्यांश आढळले तर मी राजीनामा देईन.
- शाहबाज शरीफ, पंतप्रधान
पाकचा सर्वात मोठा अपमान
ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. खटले सुरू आहेत. अशा व्यक्तीची पंतप्रधानपदी निवड होणे हा देशाचा सर्वांत मोठा अपमान आहे. अशांसोबत असेम्ब्लीमध्ये बसण्यापेक्षा राजीनामा देणे बरे.
- इम्रान खान, माजी पंतप्रधान