पाकिस्तानात जोरदार संघर्ष, ७ दिवसांत १०० मृत्यू; कुर्रम जिल्ह्यात हिंसाचार पेटला
By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2024 09:23 AM2024-11-28T09:23:29+5:302024-11-28T09:37:14+5:30
शिया आणि सुन्नी समुदायांमध्ये रविवारी स्थानिक प्रशासकीय पक्ष आणि दोन्ही समुदायांच्या ज्येष्ठांच्या बैठकीनंतर सात दिवसांचा संघर्ष विराम लागू करण्यात आला, परंतु हा संघर्ष सुरूच राहिला
पाकिस्तानच्या अशांत उत्तर पश्चिममधील कुर्रम जिल्ह्यात शिया आणि सुन्नी समुदायात जोरदार संघर्ष सुरू आहे. याठिकाणी मंगळवारी कमीत कमी १० लोकांचा मृत्यू झाला असून २१ जण जखमी झालेत. गेल्या ७ दिवसात या संघर्षात १०० लोक मारले गेलेत. संघर्ष संपण्याची चिन्हे दिसत नसून हिंसक आंदोलन आणखी भडकत आहे. गोजाघारी, मातासानगर आणि कुंज परिसरात हा संघर्ष पेटला आहे.
कुर्रम जिल्ह्यातील उपआयुक्त जावेदुल्लाह महसूद यांनी पुढाकार घेत दोन्ही समुदायात एक करार केला. त्यात संघर्ष विराम करण्यासाठी १० दिवसांची सहमती झाली. मागील आठवडाभरात १०० लोकांनी जीव गमावला आहे तर १८० जण जखमी झालेत. सर्व सुरक्षा यंत्रणा घटनास्थळी बंदोबस्ताला आहेत. पोलीस आणि सैन्याचे जवानही कुर्रम जिल्ह्यात तैनात केले आहेत. कुर्रम जिल्ह्यातील अलीजाई आणि बगान समुदायाच्या संघर्षाची ठिणगी पराचनार येथे प्रवासी बसवर झालेल्या हल्ल्यात ४७ जण मृत्युमुखी पडल्यानंतर पेटली. शुक्रवारी आणि शनिवारी या दोन्ही समुदायात संघर्ष झाला आणि हिंसेत ३७ लोक मारले होते. या हल्ल्याची अद्याप कुणीही जबाबदारी घेतली नाही.
शिया आणि सुन्नी समुदायांमध्ये रविवारी स्थानिक प्रशासकीय पक्ष आणि दोन्ही समुदायांच्या ज्येष्ठांच्या बैठकीनंतर सात दिवसांचा संघर्ष विराम लागू करण्यात आला, परंतु हा संघर्ष सुरूच राहिला. मात्र नंतर त्यात वाढ झाली असून अजूनही हिंसाचार सुरूच आहे. कुर्रम जिल्ह्यातील हॉस्पिटलमध्ये औषधांचा तुटवडा झाला आहे. पराचनार येथे झालेल्या हिंसाचारानंतर रस्ते बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे औषधांची आवक कमी आहे. रुग्णांना उपचारासाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे. पाकिस्तानच्या पख्तुनख्वा प्रांतातील अफगाणिस्तानच्या सीमेला लागून असलेल्या कुर्रम जिल्ह्यात ही घटना घडली आहे.
सुन्नीबहुल पाकिस्तानातील २४ कोटी लोकसंख्येपैकी १५ टक्के शिया मुस्लिम आहेत. दोन्ही गट साधारणपणे शांततेने एकत्र राहत असले तरी, विशेषतः कुर्रममध्ये तणाव कायम असतो. सध्याच्या हिंसाचाराचा संबंध जमिनीच्या वादाशी आहे. काही दिवसांपूर्वी पख्तूनख्वामध्ये शिया मुस्लिम नागरिकांना घेऊन जाणाऱ्या प्रवासी वाहनांवर दहशतवाद्यांनी गोळीबार केला होता. अफगाणिस्तानच्या सीमेला लागून असलेल्या आदिवासी भागात जमिनीच्या वादावरून शिया आणि सुन्नी मुस्लिमांमध्ये अनेक दशकांपासून तणाव आहे.