दहशतवाद्यांत पाकने फरक करू नये
By admin | Published: October 25, 2015 04:05 AM2015-10-25T04:05:56+5:302015-10-25T04:05:56+5:30
सर्व अतिरेकी संघटना सारख्याच. त्यामुळे त्यांना एकसारखे लेखावे; त्यांच्यात भेद करू नये, अशा शब्दांत अमेरिकन अध्यक्ष बराक ओबामा यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ
वॉशिंग्टन : सर्व अतिरेकी संघटना सारख्याच. त्यामुळे त्यांना एकसारखे लेखावे; त्यांच्यात भेद करू नये, अशा शब्दांत अमेरिकन अध्यक्ष बराक ओबामा यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांना कानपिचक्या दिल्या. व्हाईट हाऊसने एका निवेदनाद्वारे ही माहिती दिली आहे.
पाकने दहशतवादी संघटनांत भेद करू नये ही बाब अध्यक्षांसाठी महत्त्वाची होती. यापूर्वीही आम्ही पाकला हे स्पष्टपणे सांगितलेले आहे आणि कालच्या द्विपक्षीय बैठकीतही आम्ही याचा पुनरुच्चार केला, असे व्हाईट हाऊसचे माध्यम उपसचिव एरिक शुल्त्ज यांनी शुक्रवारी सांगितले. ते दैनंदिन पत्रकार परिषदेत पत्रकारांशी बोलत होते.
येथील अधिकाऱ्यांनुसार, पाकिस्तान केवळ देशात कारवाया करणाऱ्या दहशतवादी संघटनांवरच कारवाई करतो.
अमेरिका पाकसोबत व्यापक, शाश्वत व टिकाऊ भागीदारीस बांधील असल्याचे ओबामांनी अधोरेखित केले. ही भागीदारी पाकिस्तानी जनतेसाठी प्रगतीची दारे खुली करण्यासह तेथील लोकशाही व नागरी समाजाला बळकट बनवेल, असे ओबामांनी म्हटल्याचे शुल्त्ज यांनी सांगितले. दहशतवादाच्या मुद्यावर अध्यक्ष ओबामा आणि पंतप्रधान शरीफ या दोघांनीही आपल्या देशांना दहशतवाद्यांकडून धोका असल्याचे तसेच पाकिस्तानी जनतेने खूप सोसल्याचे नमूद केले. (वृत्तसंस्था)