पाकिस्तान भेदरला... म्हणाला, भारतीय आक्रमणाला प्रत्युत्तर देऊ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2019 05:16 AM2019-02-27T05:16:26+5:302019-02-27T05:16:35+5:30
सशस्त्र दले व जनतेला सज्ज राहण्याचे पाक सरकारचे आवाहन
इस्लामाबाद : भारतीय हवाई दलाने केलेल्या बालाकोटच्या दहशतवादी तळावर जोरदार हल्ला चढवून दहशतवाद्यांना संपविल्याचा भारताचा दावा पाकिस्तानने फेटाळून लावत भारताच्या आक्रमणाला ‘आम्ही आमच्या पसंतीची वेळी आणि ठिकाणी’ प्रत्युत्तर देण्याचा पंतप्रधान इम्रान खान यांनी निर्धार केला. मात्र पाकिस्तानचा सूर नरमाईचा दिसत आहे.
हल्ल्यानंतर पाकिस्तानने सुरक्षा समितीची बैठक घेतली. यात पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी सशस्त्र दले व जनतेला कोणत्याही स्थितीला सामोरे जाण्यास सज्ज राहण्याचे आवाहन केले. भारताच्या आक्रमणात कोणीही मरण पावलेले नाही, असा पाकचा दावा आहे. ३५0 दहशतवादी ठार झाल्याचा भारताचा दावा पाकच्या सुरक्षा समितीने फेटाळून लावला. बालाकोट भागात जैशचे दहशतवादी तळ नाहीतच, असा दावाही पाकिस्तानने केला आहे.
सुरक्षा समितीने जगातील प्रसार माध्यमांना प्रत्यक्ष घटनास्थळी घेऊन वस्तुस्थिती पाहण्यासाठी निमंत्रित केले आहे. मात्र या प्रसारमाध्यमांना पाकिस्तान सरकार कोणते ठिकाण दाखवणार, हा प्रश्नच आहे. पाकिस्तानचे विदेश मंत्री शाह महेमूद कुरेशी यांनी म्हणाले की, भारताने एलओसीच्या पलीकडे केलेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर देऊ . भारताने ज्या भागात हल्ला केला त्या भागात ‘जैश-ए- मोहम्मद’चे तळ नाहीत. भारतात होणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर असा प्रचार केला जात आहे. सुरक्षा समितीने म्हटले आहे की, भारताला योग्य वेळी, योग्य ठिकाणी उत्तर देईल.
पाकिस्तानने बोलावले संसदेचे विशेष अधिवेशन
निवडणुकीच्या काळात फायदा लाटण्यासाठी भारताने ही कारवाई केल्याचा दावा करत, यामुळे विभागीय शांतता आणि स्थैर्य धोक्यात आल्याचा कांगावा पाकिस्तानने केला आहे. तसेच देशाला विश्वासात घेण्यासाठी पाकिस्तान सरकारने संसदेचे संयुक्तअधिवेशन बोलावण्याचा निर्णय घेतला आहे. भारताच्या या कारवाईची माहिती देण्यासाठी पंतप्रधान इम्रान खान जगभरातील नेत्यांशीही चर्चा करणार आहेत. इम्रान खान यांनी बुधवारी नॅशनल कमांड अथॉरिटीची बैठक बोलाविली आहे.