190 हिंदूंना पाकने भारतात येण्यापासून रोखले; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2023 01:06 PM2023-02-09T13:06:35+5:302023-02-09T13:08:54+5:30
Pakistan : 'द एक्स्प्रेस ट्रिब्यून'च्या वृत्तानुसार, सिंधच्या अनेक भागातून मुले आणि महिलांसह विविध हिंदू कुटुंबे मंगळवारी वाघा सीमेवर पोहोचली. त्यांच्याकडे व्हिसा होता आणि त्यांना तीर्थयात्रेसाठी भारतात यायचे होते.
पाकिस्तानमध्ये अल्पसंख्याक हिंदू नागरिकांना येथील अडचणींचा सामना नेहमीच करावा लागत आहे. यासंदर्भात आता आणखी एक प्रकरण समोर आले आहे. पाकिस्तानच्या सिंध प्रांतात राहणाऱ्या 190 हिंदूंना येथील अधिकाऱ्यांकडून भारतात येण्यापासून रोखण्यात आले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हे लोक कथितरित्या भारताला भेट देण्याच्या उद्देशाबाबत समाधानकारक उत्तरे देऊ शकले नाहीत, असे कारण पाकिस्तानमधील अधिकाऱ्यांनी समोर केले आहे.
'द एक्स्प्रेस ट्रिब्यून'च्या वृत्तानुसार, सिंधच्या अनेक भागातून मुले आणि महिलांसह विविध हिंदू कुटुंबे मंगळवारी वाघा सीमेवर पोहोचली. त्यांच्याकडे व्हिसा होता आणि त्यांना तीर्थयात्रेसाठी भारतात यायचे होते. वृत्तानुसार, पाकिस्तानच्या इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी त्यांना भारतात का जायचे आहे, याचे योग्य कारण सांगता न आल्याने त्यांना परवानगी दिली नाही. वृत्तात सूत्रांच्या हवाल्याने म्हटले आहे की, हिंदू कुटुंबे अनेकदा धार्मिक यात्रेच्या नावाखाली व्हिसा घेतात आणि नंतर बराच काळ भारतात राहतात. सध्या मोठ्या संख्येने पाकिस्तानी हिंदू राजस्थान आणि दिल्लीत भटक्यासारखे राहत आहेत.
पाकिस्तानात अनेक हिंदू राहतात
'सेंटर फॉर पीस अँड जस्टिस पाकिस्तान'च्या रिपोर्टनुसार, पाकिस्तानमधील अल्पसंख्याक हिंदू समुदायाची लोकसंख्या 22,10,566 आहे, जी देशातील एकूण नोंदणीकृत लोकसंख्येच्या 1.18 टक्के आहे. पाकिस्तानची नोंदणीकृत लोकसंख्या 18,68,90,601 आहे. पाकिस्तानातील बहुतांश हिंदू लोकसंख्या गरीब आहे आणि देशाच्या विधिमंडळात त्यांचे प्रतिनिधित्व नगण्य आहे. बहुतेक हिंदू लोकसंख्या सिंध प्रांतात राहते, जिथे त्यांची संस्कृती, परंपरा आणि भाषा मुस्लिम रहिवाशांसोबत जुळते. दरम्यान, येथील हिंदू व्यक्ती अनेकदा अतिरेक्यांच्या छळाची तक्रारही करतात.