पाकिस्तानची धडपड! तडकाफडकी आदेश काढले; परदेशींना मालमत्ता विकणार, खर्च भागवणार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2022 11:57 AM2022-07-24T11:57:40+5:302022-07-24T11:58:05+5:30
प्रांतांकडून त्यांच्या ताब्यातील जमिनी अधिग्रहन करण्यासाठीचे अधिकार आपल्या हातात घेतले आहेत. सर्व प्रक्रिया गुंडाळून ठेवत एक अध्यादेश जारी केला आहे. यासाठी ६ कायदे धाब्यावर बसविण्यात आले आहेत.
भारताविरोधात दहशतवादावर लाखो करोडो रुपये खर्च करणारा पाकिस्तान आता अखेरच्या घटका मोजत आहे. कंगाल तर झालाच आहे पण जगभरातील देशांकडून घेतलेले कर्ज फेडू शकत नसल्याने जागतिक दिवाळखोर म्हणून घोषित व्हायचे तेवढे बाकी राहिले आहे. तरी देखील पाकिस्तानचा दहशतवाद्यांना सुरु असलेला पुरवठा काही थांबलेला नाहीय.
पाकिस्तानी रुपयाने गेल्या दोन दशकांतील सर्वात खराब प्रदर्शन केले आहे. यामुळे पाकिस्तान आता पुढचा श्रीलंका बनण्याच्या वेशीवर उभा राहिला आहे. यातून सावरण्यासाठी पाकिस्तान आता परदेशांतील तसेच देशातील संपत्ती विकणार आहे. यासाठी संसदेत पाकिस्तानी पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी प्रस्ताव मांडला आहे.
डॉलरच्या तुलनेत पाकिस्तानी रुपया 228 रुपयांवर घसरला आहे. १९९८ नंतर पाकिस्तानी रुपयामध्ये मोठी घसरण झाली आहे. जर आयएमएफकडून १.२ अब्ज डॉलर मिळाले तरी ते आर्थिक संकट दूर करण्यासाठी पुरेसे ठरणारे नाहीत.
श्रीलंकेमध्ये आर्थिक संकट आणि दिवाळखोरी आल्याने राजकीय संकटही सुरु झाले आहे. पाकिस्तानातही आता तेच होणार आहे. यापासून वाचण्यासाठी शाहबाज सरकारने परदेशातील तसेच देशातील मालमत्ता विकण्याचा निर्णय घेतला आहे. पाकिस्तानी कॅबिनेटने यासाठी सर्व प्रक्रिया गुंडाळून ठेवत एक अध्यादेश जारी केला आहे. यासाठी ६ कायदे धाब्यावर बसविण्यात आले आहेत.
यासाठी सरकारने प्रांतांकडून त्यांच्या ताब्यातील जमिनी अधिग्रहन करण्यासाठीचे अधिकार आपल्या हातात घेतले आहेत. राष्ट्रपती आरिफ अल्वी यांनी या अध्यादेशावर सही केलेली नाहीय. असे असले तरी सरकारने या संपत्ती विक्रीच्या कोणत्याही याचिका स्वीकारू नयेत असे आदेश न्यायालयांना दिले आहेत.