दहशतवाद बनला पाकिस्तानसाठी डोकेदुखी! दोन दिवसांत पोलीस अधिकाऱ्यासह ७ जवानांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2024 05:21 PM2024-04-07T17:21:20+5:302024-04-07T17:22:03+5:30
Pakistan Terrorism: सातत्याने होणाऱ्या दहशतवादी हल्ल्यांमुळे शाहबाज शरीफ सरकार विरोधकांच्या निशाण्यावर
Pakistan Terrorism: पाकिस्तान हे दहशतवाद्यांचे आश्रयस्थान असल्याचा आरोप या देशावर वारंवार केला जातो. भारतच नव्हे तर इतरही काही देशांनी संयुक्त राष्ट्रांच्या बैठकीत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तान आणि दहशतवाद यांचा संबंध असल्याचा दावा केला आहे. परंतु गेल्या काही महिन्यांपासून दहशतदावाद हा मुद्दा पाकिस्तानसाठीच डोकेदुखी ठरतानाच दिसत आहे. अलीकडेच खैबर पख्तुनख्वा येथे झालेल्या आत्मघातकी हल्ल्यात ५ चिनी नागरिकांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर काही दिवसांनी गेल्या दोन दिवसांत झालेल्या दहशतवादी हल्ल्यात एका पोलीस अधिकाऱ्यासह 6 सुरक्षा जवानांचा मृत्यू झाला आहे. पाकिस्तानातील खैबर पख्तूनख्वा आणि बलुचिस्तान प्रांतातील अशांत भागातही हे हल्ले करण्यात आले आहेत. या हल्ल्यांना प्रत्युत्तर देताना पोलिसांनी १२ दहशतवाद्यांनाही ठार केले आहे.
पाकिस्तान सशस्त्र दलाची मीडिया शाखा इंटर-सर्व्हिसेस पब्लिक रिलेशन्स (ISPR) ने रविवारी सांगितले की बलुचिस्तान प्रांतातील दोन घटनांमध्ये चार दहशतवादी मारले गेले आहेत. खैबर पख्तुनख्वा (KP) मध्ये स्थित डेरा इस्माईल खान जिल्ह्यातील कुलाची तहसीलच्या कोट सुलतान भागात सुरक्षा दलांनी केलेल्या कारवाईत आठ दहशतवादी मारले गेले. मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांकडून शस्त्रास्त्रे, दारूगोळा आणि मोठ्या प्रमाणात स्फोटके जप्त करण्यात आली आहेत.
लक्की मारवत येथे दोन हल्ले
अधिकाऱ्यांनी सांगितले की, दहशतवाद्यांनी शुक्रवारी रात्री खैबर पख्तुनख्वामधील लक्की मारवत येथे दोन हल्ले केले. यामध्ये एक पोलिस अधीक्षक (डीएसपी) आणि दोन पोलिसांचा मृत्यू झाला, तर एक हवालदार जखमी झाला. ईद-उल-फित्रच्या आधी कडेकोट सुरक्षा व्यवस्था करण्यासाठी डीएसपीने इतर पोलिस कर्मचाऱ्यांसह पेशावर-कराची महामार्गावर तात्पुरती चौकी उभारली होती.
मंजीवाला चौकाजवळ डीएसपीवर गोळीबार
मिळालेल्या माहितीनुसार, पोस्टवरून परतत असताना मंजीवाला चौकाजवळ अगोदरच घुसलेल्या दहशतवाद्यांनी पोलिसांच्या वाहनावर गोळीबार सुरू केला. या घटनेत डीएसपी आणि कॉन्स्टेबल नसीम गुल यांचा मृत्यू झाला. याआधी शुक्रवारी रात्री सारा दर्गा परिसरातही दहशतवादी हल्ला झाला होता. यामध्ये काही अज्ञात हल्लेखोरांनी कॉन्स्टेबल सनमत खान यांच्यावर गोळीबार केल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. यानंतर शनिवारी बाजौर जिल्ह्यातील मामुंद तालुक्यात स्फोट झाल्याची घटना उघडकीस आली. या स्फोटात एका पोलीस अधिकाऱ्याचा मृत्यू झाला तर दुसरा जखमी झाला. शनिवारी रात्रीच टँक जिल्ह्यातील मियाँ लाल पोलिस चौकीजवळ काही अज्ञातांनी एका हेड कॉन्स्टेबलची हत्या केली होती.
शहबाज सरकार विरोधकांच्या निशाण्यावर
अशाप्रकारे गेल्या दोन दिवसांत एका पोलिस अधिकाऱ्यासह 6 सुरक्षा कर्मचाऱ्यांना आपला जीव गमवावा लागला आहे. पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी लक्की मारवत येथे पोलिसांवर झालेल्या हल्ल्याचा तीव्र निषेध केला. पण पाकिस्तानमध्ये सातत्याने होणाऱ्या दहशतवादी हल्ल्यांमुळे शाहबाज शरीफ सरकारही विरोधकांच्या निशाण्यावर आले आहे.