Pakistan Imran Khan : 'संसद बरखास्त करण्याचा निर्णय असंवैधानिक'; इम्रान खान यांना पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाचा झटका
By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2022 09:40 PM2022-04-07T21:40:48+5:302022-04-07T21:41:44+5:30
Pakistan Imran Khan : इम्रान खान यांना करावा लागणार अविश्वास प्रस्तावावर मतदानाचा सामना.
Pakistan Imran Khan : पाकिस्तानातील राजकीय संकटादरम्यान सर्वोच्च न्यायालयानं पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना झटका दिला आहे. उपसभापतींचा निर्णय असंवैधानिक असल्याचं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलंय. आता येत्या ९ एप्रिल रोजी अविश्वास प्रस्तावावर मतदान केलं जाणार आहे. आम्ही सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचं स्वागत करतो आणि आम्ही अविश्वास प्रस्तावाचा सामना करण्यासाठी तयार आहोत असं पीटीआयच्या एका नेत्यानं सांगितलं.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर नॅशनल असेंब्ली पुन्हा स्थापित झाली आहे. यासह इम्रान खान हे पुन्हा पाकिस्तानचे पंतप्रधानही झाले आहेत. "पंतप्रधान संविधानाला बांधिल आहेत. त्यामुळे ते राष्ट्राध्यक्षांना संसद बरखास्त करण्याचा सल्ला देऊ शकत नाहीत. जर अविश्वास प्रस्ताव यशस्वी झाल्यास नव्य पंतप्रधानांची निवड केली जावी," असं न्यायालयाने म्हटले आहे.
Supreme Court of Pakistan says the prime minister was bound by Constitution, therefore, he could not advise the president to dissolve assemblies; no-trust move at 10am on Saturday (9th April): Pakistan's Geo News pic.twitter.com/7surhs3fm9
— ANI (@ANI) April 7, 2022
"या निर्णयानंतर पाकिस्तानचा बचाव झाला आहे. पाकिस्तानच्या लोकांच्या प्रार्थना कामी आल्या. अविश्वास ठरावादरम्यान आम्ही एक सरप्राईज देऊ. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयानंतर नॅशनल असेंबली अधिक मजबूत होईल," असं असेंबलीतील विरोधी पक्षनेते शाहबाज शरीफ म्हणाले.
निर्णय मान्य असेल
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयापूर्वी पंतप्रधान इम्रान खान यांनी त्यांच्या कायदेशीर टीमसोबत एक महत्त्वाची बैठक घेतली आणि न्यायालयाचा जो निर्णय असेल तो आपल्याला आणि पक्षाला मान्य असेल, असं सांगितलं.
तर दुसरीकडे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयापूर्वी विरोधकांनीही एका बैठकीचं आयोजन केलं होतं. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार संध्याकाळी साडेसात वाजता पीएमएल-एनच्या अध्यक्षांच्या निवासस्थानी ही बैठक पार पडली. या बैठकीसाठी बिलावल भुट्टो, आसिफ जरदारी आणि मौलाना फजलुर रहमान यांना निमंत्रण देण्यात आलं होतं.