अफगाण हल्ल्याचा पाकवर संशय
By admin | Published: August 26, 2016 04:07 AM2016-08-26T04:07:03+5:302016-08-26T04:07:03+5:30
विद्यापीठावर केलेल्या हल्ल्यात १६ ठार, तर ३६ जखमी झाले. गुरुवारी पहाटे दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालून २०० जणांची मृत्यूच्या जबड्यातून सुटका केली.
काबूल : अफगाणिस्तानात दहशतवाद्यांनी विद्यापीठावर केलेल्या हल्ल्यात १६ ठार, तर ३६ जखमी झाले. गुरुवारी पहाटे दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालून २०० जणांची मृत्यूच्या जबड्यातून सुटका केली.
राजधानी काबूलमधील अमेरिकी युनिव्हर्सिटी आॅफ अफगाणिस्तानला दहशतवाद्यांनी बुधवारी लक्ष्य केले. पोलीस व सुरक्षा दलांनी कारवाई सुरू केल्यानंतर चकमक उडाली. मृतांत सात विद्यार्थी आणि एका शिक्षकाचा समावेश असून, चकमकीत तीन पोलीस अधिकारी व दोन सुरक्षारक्षकही मृत्युमुखी पडल्याचे गृहमंत्रालयाने सांगितले.
या हल्ल्याची जबाबदारी कोणत्याही संघटनेने घेतली नाही. मात्र, तालिबानवर संशय व्यक्त होत आहे. हा हल्ला कोणी केला याचा आम्ही तपास करीत आहोत, असे तालिबानचा प्रवक्ता जबीउल्ला मुजाहिद याने सांगितले. अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अश्रफ घनी यांनी शेजारील पाकिस्तानकडे बोट दाखविले. पाकिस्तानच तालिबानला आश्रय आणि पाठबळ देत असून, या हल्ल्याचा कटही पाकमध्येच आखला गेला होता, असा घणाघात त्यांनी केला. (वृत्तसंस्था)