दाऊदवरून पाकिस्तानचा यू-टर्न; आता म्हणे, तो आमच्या देशात वास्तव्यासच नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2020 08:01 AM2020-08-23T08:01:21+5:302020-08-23T08:06:58+5:30
अवघ्या २४ तासांत पाकिस्ताननं दाऊद इब्राहिमच्या वास्तव्यावरून यू-टर्न घेतला
इस्लामाबाद: कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम आपल्याच भूमीवर असल्याची कबुली पाकिस्ताननं काल दिली होती. मात्र आता पाकिस्ताननं कोलांटउडी घेतली आहे. अवघ्या २४ तासांच्या आत पाकिस्ताननं यू-टर्न घेत दाऊद देशात वास्तव्यास नसल्याचा दावा केला आहे. पाकिस्ताननं स्वत:च दाऊदच्या वास्तव्याची कबुली दिल्यानं त्याबद्दलचं वृत्त भारतीय माध्यमांनी दिलं. त्यानंतर पाकिस्ताननं स्पष्टीकरण दिलं. दाऊद पाकिस्तानात नसल्याचा दावा त्यांनी केला.
पाकिस्तानी परराष्ट्र मंत्रालयानं एक निवेदन प्रसिद्ध केलं. 'पाकिस्तानकडून नवे निर्बंध घातले जात आहेत, अशा बातम्या काही ठिकाणी प्रसिद्ध झाले आहेत. मात्र यात अजिबात तथ्य नाही. काही कुख्यात व्यक्तींचं (दाऊद इब्राहिम) वास्तव्य देशात असल्याची कबुली पाकिस्ताननं दिल्याचं वृत्त भारतीय माध्यमांनी दिलं आहे. या वृत्ताला कोणताही आधार नाही,' असं स्पष्टीकरण पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयानं दिलं आहे.
#Breaking
— Geeta Mohan گیتا موہن गीता मोहन (@Geeta_Mohan) August 22, 2020
Pakistan officially denies the presence of Dawood Ibrahim in Pakistan.
Says, they are just "reproducing" the #UNSC Statutory Notifications (S.R.O.) and say that there is no admission of #DawoodIbrahim being in Pakistan. https://t.co/bDlguLHdOJpic.twitter.com/dqOtgJHyRO
पाकिस्ताननं दिली होती कबुली
फायनान्शियल ऍक्शन टास्क फोर्सच्या कारवाईपासून स्वत:चा बचाव करण्यासाठी पाकिस्ताननं ८८ दहशतवादी संघटना आणि त्यांच्या म्होरक्यांची यादी जाहीर केली. त्यांच्यावर निर्बंध लादण्यात आल्याचा दावा पाकिस्तानकडून करण्यात आला. त्या यादीत दाऊद इब्राहिमच्या नावाचाही समावेश आहे. त्यामुळे पाकिस्ताननं पहिल्यांदाच दाऊद त्यांच्या भूमीवर वास्तव्यास असल्याची कबुली दिली. इम्रान खान सरकारनं प्रसिद्ध केलेल्या यादीत दाऊदच्या नावापुढे व्हाऊस हाऊस, कराची असा पत्ता आहे.
दाऊद आपल्या भूमीत वास्तव्यास असल्याची बाब पाकिस्ताननं कायम नाकारली आहे. मात्र आता पाकिस्तान फायनान्शियल ऍक्शन टास्क फोर्सच्या ग्रे लिस्टमधून बाहेर पडण्याच्या प्रयत्नात आहे. त्यासाठी आपण दहशतवाद आणि दहशतवाद्यांविरोधात कारवाई करत असल्याचं दाखवणं गरजेचं आहे. त्यामुळेच पाकिस्तानकडून कारवाईचा दिखावा केल्याचं बोललं जात आहे. पाकिस्तानचा समावेश ग्रे लिस्टमधून ब्लॅक लिस्टमध्ये झाल्यास मोठा आर्थिक फटका बसू शकेल.
दाऊद इब्राहिमचे वास्तव्य आमच्याच देशात, पाकिस्तानने पहिल्यांदाच दिली कबुली