भारताची डोकेदुखी वाढणार; पाकिस्तान रशियाकडून रणगाडे, लढाऊ विमानांची खरेदी करणार
By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2018 01:17 PM2018-04-08T13:17:44+5:302018-04-08T13:17:44+5:30
हवाई सुरक्षा यंत्रणेच्या खरेदीसाठीही चर्चा सुरू
पाकिस्तानने रणगाडे आणि लढाऊ विमानांच्या खरेदीसाठी रशियाशी बोलणी सुरु केली आहे. याशिवाय रशियाकडून हवाई सुरक्षा यंत्रणेची खरेदी करण्याचाही पाकिस्तानचाही प्रयत्न आहे. पाकिस्तानचे संरक्षणमंत्री खुर्रम दस्तगीर खान यांनी याबद्दलच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. पाकिस्तान आणि चीनचे सौख्य जगजाहीर असताना आता पाकिस्तान आणि रशियाची जवळीक वाढताना दिसत आहे.
'रशियाकडून हवाई सुरक्षा यंत्रणा खरेदी करण्याचा आमचा प्रयत्न आहे. रशियाचे शस्त्रास्त्र तंत्रज्ञान अद्ययावत आहे. त्यामुळेच आम्ही त्यांच्याकडून हवाई सुरक्षा खरेदी करण्याच्या विचारात आहोत. त्यासाठी रशियाशी चर्चा सुरु आहे. याबद्दलच्या वाटाघाटी पूर्ण झाल्यावर अधिकृत घोषणा केली जाईल,' अशी माहिती खान यांनी स्पुटनिक या रशियन वृत्तसंस्थेशी बोलताना दिली. याशिवाय पाकिस्तान रशियाकडून टी-90 रणगाड्यांची खरेदी करण्यासही उत्सुक असल्याचे खान म्हणाले. विशेष म्हणजे भारतही मोठ्या प्रमाणात टी-90 रणगाड्यांचा वापर करतो. थर्ड जनरेशन मिसाईल सिस्टीमसह टी-90 रणगाडे आणून लष्कराचे सामर्थ्य वाढवण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न आहे. 'टी-90 रणगाड्यांच्या लष्कराच्या ताफ्यात समावेश करण्यास आम्ही उत्सुक आहोत. आम्ही एकदाच रणगाडे खरेदी करुन थांबणार नाही. रशियाकडून दीर्घकाळ रणगाड्यांची खरेदी करण्याचा आमचा प्रयत्न असेल,' असेही खान यांनी रशियन वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत म्हटले.
हवाई सुरक्षा यंत्रणा, टी-20 रणगाडे यांच्यासोबतच लढाऊ विमानांची खरेदी करण्याचाही पाकिस्तानचा प्रयत्न आहे. रशियाकडून Su-35 लढाऊ विमाने खरेदी करण्याबद्दलची चर्चा पाकिस्तानकडून सुरु आहे. ही चर्चा सध्या प्राथमिक टप्प्यात आहे. पुढील काही वर्षात याबद्दलच्या कराराला मूर्त स्वरुप मिळेल, असे वृत्त रशियन संकेतस्थळांनी दिले आहे. याशिवाय अफगाणिस्तानमधील परिस्थितीबद्दलही पाकिस्तान आणि रशियामध्ये चर्चा झाली आहे. अफगाणिस्तान स्थिर राहावा, अशी दोन्ही देशांची इच्छा असल्याचेही पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी मुलाखतीत म्हटले.