पाकिस्तानमध्ये मंदिराची तोडफोड, पंतप्रधानांकडून कडक कारवाईचे आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2019 06:13 PM2019-02-06T18:13:48+5:302019-02-06T20:16:25+5:30
इम्रान खान यांनी ट्विट करुन, दोषींना अटक करुन त्यांच्यावर कडक कारवाई करा, असे आदेश स्थानिक प्रशासनाला दिले आहेत.
इस्लामाबाद - पाकिस्तानच्या सिंध प्रांतामध्ये काही समाजकंटकांनी हिंदू मंदिराची तोडफोड करून पवित्र ग्रंथांची जाळले आहेत. याबाबत पंतप्रधान इम्रान खान यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली असून दोषींवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. खैरपुर जिल्ह्यातील कुंब शहरात गेल्या आठवड्यात ही घटना घडली होती. मंदिराची तोडफोड करून अज्ञातांनी पळ काढला आहे. इम्रान खान यांनी मंगळवारी याबाबत ट्विट करुन प्रशासनाला आदेश दिले आहेत.
इम्रान खान यांनी ट्विट करुन, दोषींना अटक करुन त्यांच्यावर कडक कारवाई करा, असे आदेश स्थानिक प्रशासनाला दिले आहेत. हे कुरानच्या विरोधात असून हिंदू समुदायातील नागरिकांनी याप्रकरणी खटला दाखल केला आहे. हे मंदिर हिंदू समुदायातील लोकांच्या घराजवळच असल्याने या मंदिराच्या देखभालीसाठी कुणालाही ठेवण्यात आले नव्हते. मंदिराच्या तोडफोडीच्या घटनेनंतर येथील स्थानिकांनी घराबाहेर पडून निदर्शने केली आहेत. पाकिस्तान हिंदू परिषदेचे सल्लागार राजेश कुमार हरदसानी यांनी हिंदू मंदिराच्या सुरक्षेसाठी विशेष कार्यदल स्थापन करण्याची मागणी केली आहे. या घटनेमुळे हिंदू समुदायातील लोकांमध्ये रोष निर्माण झाला आहे. या घटनांमुळे देशातील धार्मिक वातावरण खराब होत असल्याचंही हरदसानी यांनी म्हटलंय. दरम्यान, पाकिस्तानच्या 22 कोटी जनतेमध्ये हिंदू समुदायातील नागरिकांची संख्या केवळ 2 टक्के एवढी आहे.
The govt of Sindh must take swift and decisive action against the perpetrators. This is against the teachings of the Quran. pic.twitter.com/aNr9uAkyTk
— Imran Khan (@ImranKhanPTI) February 5, 2019