पाकिस्तान : पेशावर युनिव्हर्सिटीजवळ दहशतवादी हल्ला, 11 जणांचा मृत्यू; 35 जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2017 11:45 AM2017-12-01T11:45:47+5:302017-12-01T14:27:43+5:30
पाकिस्तानच्या पेशावरमध्ये दहशतवादी हल्ला झाल्याचं वृत्त आहे. पेशावर कृषी संचालनालयाच्या इमारतीवर हा हल्ला झालाय. हल्ला करणा-या 4 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे
पेशावर: पाकिस्तानच्या पेशावरमध्ये दहशतवादी हल्ला झाल्याचं वृत्त आहे. पेशावर कृषी संचालनालयाच्या इमारतीवर हा हल्ला झालाय. हल्ला करणा-या 4 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. पण दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात 11 जणांचा मृत्यू झाला तर जवळपास 35 जण जखमी झाले आहेत. पाकिस्तानच्या arynews ने याबाबत वृत्त दिलं आहे.
तहरीक-ए-तालिबान या संघटनेने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारल्याची माहिती आहे. पेशावर कृषी संचालनालयाच्या इमारतीकडे जाणारा रस्ता प्रशासनाने बंद केला आहे. पोलीस आणि पाकिस्तानी सेनेने इमारतीला वेढा घातला आहे. जखमींमध्ये काही विद्यार्थ्यांचाही समावेश असल्याची माहिती आहे. जखमींना जवळच्या टीचिंग हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे.
जिओ न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, सकाळी 8 वाजून 15 मिनिटांनी गोळीबाराला सुरूवात झाली. गोळीबाराचा आवाज ऐकून आम्ही पळण्याचा प्रयत्न केला पण माझे दोन मित्र गोळीबारात जखमी झाले अशी माहिती एका विद्यार्थ्याने दिली. गेल्या आठवड्यात पेशावरमध्ये झालेला हा दुसरा दहशतवादी हल्ला आहे. यापूर्वी हयाताबाद येथे झालेल्या आत्मघाती हल्ल्यात वरिष्ठ पोलीस अधिकारी मोहम्मद अशरफ नूर यांचा मृत्यू झाला होता.