1999मध्ये भारतीय विमान 'हायजॅक' करणारा दहशतवादी ठार, पाकिस्तानात नाव बदलून राहत होता
By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2022 12:43 PM2022-03-08T12:43:53+5:302022-03-08T12:50:52+5:30
24 डिसेंबर 1999 रोजी एअर इंडियाच्या IC-814 विमानाचे अपहरण करणाऱ्या पाच दहशतवाद्यांपैकी जहूर मिस्त्री उर्फ जाहिद अखुंद याची कराचीत हत्या झाल्याची बातमी समोर आली आहे.
कराची: 24 डिसेंबर 1999 रोजी एअर इंडियाच्या IC-814 विमानाचे अपहरण करणाऱ्या दहशतवाद्यांपैकी एक दहशतवादी जहूर मिस्त्री उर्फ जाहिद अखुंद याची हत्या झाल्याची बातमी समोर आली आहे. पाकिस्तानातील कराची येथे त्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, 1 मार्च रोजी दुचाकीवरुन आलेल्या दोन हल्लेखोरांनी टार्गेट किलिंग अंतर्गत घरात घुसून जहूर मिस्त्रीवर गोळ्या झाडल्या. जहूर मिस्त्री हा जैशचा दहशतवादी होता आणि कराचीमध्ये व्यापाऱ्याची छुपी ओळख घेऊन राहत होता.
जैशच्या दहशतवाद्यांमध्ये खळबळ
दोन्ही हल्लेखोरांचे फुटेजही सीसीटीव्हीत कैद झाले आहेत, मात्र दोघांनी मास्क घातले असल्याने त्यांची ओळख पटू शकली नाही. या हत्याकांडाने जैशच्या दहशतवाद्यांमध्ये खळबळ उडाली असून पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयही हैराण झाली आहे. पाकिस्तानी मीडियामध्ये या हत्याकांडाचे कुठेही कव्हरेज नाही. पाकिस्तानच्या जिओ टीव्हीने या हत्याकांडाचे वृत्त दिले असले तरी झहूर मिस्त्रीचे खरे नाव समोर आले नाही.
अंत्यविधीत अनेक दहशतवादी सामील
जिओ टीव्हीने आपल्या अहवालात फक्त असे म्हटले आहे की, कराचीमध्ये एका व्यावसायिकाची हत्या करण्यात आली आहे. अहवालात सीसीटीव्ही फुटेजही दाखवण्यात आले असून, हत्येचा कट रचण्यात आल्याचे सांगण्यात आले. जहूर मिस्त्रीच्या हत्येनंतर घटनास्थळी मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. दहशतवाद्याच्या अंत्यसंस्कारात जैशचे अनेक बडे दहशतवादी सामील झाल्याचीही बातमी आहे.
कोण होता जुहूर मिस्त्री?
जैशचा दहशतवादी जहूर मिस्त्री हा एअर इंडियाचे IC-814 अपहरण करणाऱ्या पाच दहशतवाद्यांपैकी एक होता. 24 डिसेंबर 1999 रोजी दहशतवाद्यांनी एका भारतीय विमानाचे हवेतून अपहरण केले होते. नेपाळमधील काठमांडू येथून विमानाचे अपहरण करुन ते अफगाणिस्तानातील कंदाहार येथे नेण्यात आले होते.
काय होती त्यांची मागणी?
मसूद अझहर, मुश्ताक अहमद आणि अहमद उमर सईद शेख या दहशतवाद्यांच्या सुटकेच्या बदल्यात प्रवाशांच्या सुटकेची अट ठेवण्यात आली होती. यादरम्यान, विमानातील प्रवासी आठवडाभर दहशतवाद्यांच्या ताब्यात होते. त्या विमान अपहरणात एका प्रवाशाचा मृत्यूही झाला होता. पण, सुदैवाने 170 जणांची सुखरुप सुटका करण्यात आली. त्या घटनेनंतर जहूर भूमिगत झाला, काही काळानंतर तो कराचीमध्ये नाव बदलून व्यवसाय करत असल्याचे समजले.