करायला गेले एक... पाकिस्तानात क्षेपणास्त्राची चाचणी करताना स्वत:चीच लोकं झाली जखमी
By देवेश फडके | Published: January 21, 2021 03:06 PM2021-01-21T15:06:18+5:302021-01-21T15:08:32+5:30
एकीकडे जो बायडन यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली असताना, पाकिस्तानने शाहीन-३ या क्षेपणास्त्राची चाचणी केली. मात्र, क्षेपणास्त्र रहिवासी भागात शिरल्याने मोठे नुकसान झाल्याची माहिती मिळाली आहे.
इस्लामाबाद : एकीकडे जो बायडन यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली असताना, पाकिस्तानने शाहीन-३ या क्षेपणास्त्राची चाचणी केली. मात्र, क्षेपणास्त्र रहिवासी भागात शिरल्याने मोठे नुकसान झाल्याची माहिती मिळाली आहे.
बॅलेस्टिक क्षेपणास्त्र शाहीन-३ तंत्रज्ञान आणि शस्त्र प्रणाली यासंदर्भात आधुनिक असल्याचे सांगितले जाते. मात्र, पाकिस्तानने घेतलेली ही चाचणी आता वादात सापडली आहे. बलुचिस्तानातील डेरा गाजी खान येथून ही चाचणी करण्यात आली. परंतु, डेगा बुग्ती नामक रहिवासी भागात हे क्षेपणास्त्र शिरल्याने अनेक घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले, तर अनेक जण यामध्ये जखमी झाले.
बलुचिस्तान रिपब्लिक पार्टीने ट्विट करत, पाकिस्तानी सैन्याने शाहीन-३ क्षेपणास्त्राची चाचणी केली. मात्र, येथील रहिवासी भागात क्षेपणास्त्र शिरल्याने डझनभर घरांचे मोठे नुकसान झाले असून, अनेक नागरिक यात जखमी झाले आहेत, अशी माहिती दिली. तसेच बलुचिस्तानाला पाकिस्तानी सैन्याची प्रयोगशाळा बनवल्याचा आरोपही या पक्षाकडून करण्यात आला.
बलुचिस्तान आमची मातृभूमी आहे. ही कोणती प्रयोगशाळा नाही. पाकिस्तानने केलेल्या या क्षेपणास्त्र चाचणीविरोधात पीडितांनी आवाज उठवावा, असे आवाहन या पक्षाकडून करण्यात आले आहे. तसेच यापूर्वीही क्षेपणास्त्रांची चाचणी करताना अनेक जण जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे.
बॅलेस्टिक क्षेपणास्त्र असलेल्या शाहीन-३ ची मारक क्षमता २ हजार ७५० कि.मी. आहे. मध्य-पूर्व आशियातील काही भागासह भारतात आपल्या लक्ष्यापर्यंत पोहोचू शकते. आत्मसंरक्षण धोरणाअंतर्गत या क्षेपणास्त्राची चाचणी करण्यात आल्याचे पाकिस्तानी सैन्याकडून सांगण्यात आले.
दरम्यान, पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी या क्षेपणास्त्राच्या यशस्वी चाचणीसाठी शास्त्रज्ञांचे अभिनंदन केले आहे. अमेरिकेतील नव्याने आलेल्या जो बायडन सरकारवर दबाव आणण्यासाठी पाकिस्तानने शाहीन-३ क्षेपणास्त्राची चाचणी केल्याचे सांगितले जात आहे.