Pakistan: 'आमचे हात बांधले, सरकार कमकुवत केले...' इम्रान खान यांचा पाकिस्तानी सैन्यावर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2022 04:41 PM2022-06-02T16:41:29+5:302022-06-02T16:41:43+5:30
Imran Khan on Pak Army: 'सत्तेत आल्यानंतर आमचे सरकार कमकुवत होते, त्यामुळेच आम्हाला युती करावी लागली.'
Imran Khan On Pakistan Army:पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी आपले सरकार कमकुवत सरकार असल्याची कबुली दिली आहे. इम्रान यांनी पाकिस्तानी लष्करावर जोरदार हल्ला चढवत सरकारला कमजोर केल्याचा आरोप केला. ते म्हणाले की, सरकारला ब्लॅकमेल केले जात होते. सत्तेची लगाम माझ्या हातात नव्हती. पाकिस्तानात सत्तेची लगाम कोणाच्या हातात असते, हे सर्वांनाच माहिती आहे, असेही ते म्हणाले.
इम्रान खान यांच्या नेतृत्वाखालील सरकारने संसदेत अविश्वासाचा ठराव गमावल्यानंतर एप्रिलमध्ये त्यांना सत्ता सोडावी लागली. त्यावेळीही इम्रान खान यांनी अमेरिकेवर कट रचल्याचा आरोप केला होता. पाकिस्तानी वृत्तपत्र डॉनने दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी पाकिस्तानी मीडिया 'बोल न्यूज'ला दिलेल्या मुलाखतीत इम्रान खान यांना त्यांच्याविरोधातील अविश्वास ठरावाच्या रात्रीच्या घटनांबाबत प्रश्न विचारण्यात आला. पाकिस्तान पीपल्स पार्टी आणि पाकिस्तान मुस्लीम लीग-नवाज यांच्याविरुद्धचे आदेश कोण जारी करत होते आणि कोण अडथळा आणत होते, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला.
इम्रान सरकार कमकुवत होते का?
पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफचे प्रमुख इम्रान खान म्हणाले की, आमचे सरकार कमकुवत होते. आमचे हात बांधले गेले. आम्हाला सर्वत्र ब्लॅकमेल केले जात होते. आमच्याकडे सत्ता नव्हती. पाकिस्तानात सत्ता कोणाच्या हातात असते, हे सगळ्यांनाच माहीत आहे. त्यामुळेच त्यांच्यावर विश्वास ठेवावा लागला, असेही ते म्हणाले.
'..तर देशाचे तीन तुकडे होतील'
इम्रान खान पुढे म्हणाले की, आम्ही नेहमीच त्यांच्यावर अवलंबून होतो. त्यांनी खूप चांगली कामे केली, पण अनेक गोष्टी ज्या करायला हव्या होत्या त्या केल्या नाहीत. त्यांच्याकडे सत्ता आहे कारण ते NAB (नॅशनल अकाउंटेबिलिटी ब्युरो) सारख्या संस्थांवर नियंत्रण ठेवतात. योग्य निर्णय न घेतल्यास देशाचे तीन तुकडे होतील, असे म्हणत पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी सध्याच्या सरकारला मोठा इशारा दिला आहे.