पाक ५ चिनी नागरिकांना देणार २१ कोटी रुपये
By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2024 07:40 AM2024-06-04T07:40:25+5:302024-06-04T07:40:39+5:30
पाकिस्तान आणि चीन यांची जवळीक असल्याचं वरवर दिसतं खरं; पण पाकिस्तानी आणि चिनी जनतेत या स्वार्थी सख्याबाबत कायम नाराजी व्यक्त केली जाते.
‘तुझं माझं जमेना आणि तुझ्यावाचून करमेना’ अशी पाकिस्तान आणि चीन यांची अवस्था आहे. खरं तर दोघांनाही एकमेकांचं ओझं आहे; पण हे ओझं बाळगण्यावाचून त्यांना पर्याय नाही. भारताच्या शेजाऱ्यांना आपल्या बाजूनं वळवण्याचं, त्यांना आमिष दाखवण्याचं आणि भारताविषयी त्यांच्या मनात किल्मिष पेरण्याचं काम गेल्या कित्येक वर्षांपासून चीन नित्यनेमानं करीत आहे. भारताची चारही बाजूनं नाकाबंदी करण्याची आणि भारताला आपल्यापेक्षा मोठं होऊ न देण्याची प्रत्येक संधी चीन शोधत असतो, तर आपल्या शेजारचा भारत बघता बघता आपल्या किती पुढे निघून गेला, भारत कुठे आणि आपण कुठे याची टोचणी पाकिस्तानला कायम लागलेली असते.
पाकिस्तान आणि चीन यांची जवळीक असल्याचं वरवर दिसतं खरं; पण पाकिस्तानी आणि चिनी जनतेत या स्वार्थी सख्याबाबत कायम नाराजी व्यक्त केली जाते. पाकिस्तानी जनता तर चीनवर अक्षरश: दात खाऊन आहे. इकडे दोस्तीचा हात पुढे करून, आम्ही तुम्हाला मदत करतोय, असं दाखवून चीन आपल्या देशाचे लचके तोडतोय, हेही पाकिस्तानी जनतेला चांगलंच ठाऊक आहे. त्यामुळे अनेकदा चीनविरुद्ध पाकिस्तानात उघड असंतोष आणि नाराजीही व्यक्त केली जाते. पाकिस्तानात असलेल्या चिनी नागरिकांवर पाकिस्तानात होणारे हल्ले, त्यात चिनी नागरिकांचे जाणारे जीव हीदेखील नित्याचीच बाब आहे.
अलीकडेच पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा भागात झालेल्या आत्मघाती हल्ल्यात पाच चिनी इंजिनिअर्स मारले गेले. त्यात पाकिस्तानच्या एका ड्रायव्हरचाही अंत झाला. पाकिस्तानी हल्लेखोरांनी पाकिस्तानच्या ज्या भागात चिनी नागरिक राहतात त्या ठिकाणी स्फोटकांनी भरलेली कार घुसवली आणि स्फोट घडवून आणला. त्यात मोठं आर्थिक नुकसान तर झालंच; पण पाच चिनी इंजिनिअर्सही मारले गेले. त्यांना मारणं हाच त्यांचा उद्देश होता. आपल्या नागरिकांवर पुन्हा एकदा झालेल्या अशा हल्ल्यानं चीनचा तीळपापड झाला. त्यांनी पाकिस्तानवर डोळे वटारल्यानंतर पाकिस्ताननंही सारवासारव केली आणि या हल्ल्याचा प्लॅन अफगाणिस्तानमध्ये झाला होता, असा आरोप केला.
अफगाण प्रशासनानं मात्र लगोलग याचा इन्कार केला आणि पाकिस्ताननं दुसऱ्यांवर आरोप करण्यापेक्षा स्वत:चं घर नीट सांभाळावं असे त्यांचे कानही टोचले. त्यानंतर पाकिस्तानचे अर्थमंत्री मोहम्मद औरंगजेब यांच्या अध्यक्षतेखाली लगोलग एक उच्चस्तरीय बैठक झाली आणि त्यात चिनी नागरिकांच्या नातेवाइकांना नुकसानभरपाई देण्याचा निर्णय झाला. चीनचा राग शांत करण्यासाठी ठार झालेल्या प्रत्येक इंजिनिअरच्या नातेवाइकांना आता ५ लाख १६ हजार अमेरिकन डॉलर्स दिले जाणार आहेत. बीजिंगमध्ये असलेल्या पाकिस्तानी दूतावासाच्या माध्यमातून या चिनी इंजिनअर्सच्या नातेवाइकांच्या थेट बँक खात्यात ही रक्कम वर्ग करण्यात येईल.
मारल्या गेलेल्या चिनी नागरिकांच्या नातेवाइकांना एवढी मोठी रक्कम देण्यावरूनही पाकिस्तानी नागरिकांनी मोठा रोष व्यक्त केला आहे. जे चिनी नागरिक आपल्याच देशात येऊन आपल्याला ओरबाडताहेत, त्यांना अद्दल घडवण्याऐवजी पाकिस्तान सरकार त्यांच्यासाठी पायघड्या घालत आहे , याचा पाकिस्तानी नागरिकांनी तीव्र शब्दांत निषेध केला आहे; पण चीनचं लांगुलचालन करण्याशिवाय पाकिस्तानपुढेही दुसरा पर्याय राहिलेला नाही. रसातळाला गेलेल्या पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेला काडीचा का होईना आधार मिळावा, यासाठी पाकिस्ताननंच चीनपुढे हात पसरले आहेत. त्यामुळे पाकिस्तानातील बरेच प्रकल्प चीनचे तंत्रज्ञ आणि इंजिनिअर्सच्या भरवशावर सुरू आहेत. पाकिस्तानकडे त्या दर्जाचे तंत्रज्ञ नसल्यामुळे अर्थातच चिनी तंत्रज्ञ त्याचा दामदुप्पट रग्गड पैसा पाकिस्तानकडून वसूल करीत आहे.
पाकिस्तानात चिनी नागरिकांवर सतत हल्ले होतच असतात. २००९ मध्ये पाकिस्तानी हल्लेखोरांनी एकाच वेळी चीनच्या नऊ नागरिकांना ठार मारलं होतं. त्यानंतर चिनी नागरिकांच्या सुरक्षेसाठी ३५०० सुरक्षा सैनिकांची फौज तैनात करण्यात आली होती. ती संख्या आता सात हजार झाली आहे. तरीही हे हल्ले अजूनही थांबलेले नाहीत.
अतिरेक्यांना नागरिकांचीही साथ !
गेल्या काही वर्षांत पाकिस्तानातील अतिरेकी संघटनाही चिनी नागरिकांच्या मागावर आहेत. चीनमुळेच आपल्या देशाचं नुकसान होतंय, इथले स्थानिक उद्योग आणि कारभार चिनी लोक बळकावताहेत, स्थानिकांवर अन्याय करून त्यांना बेघर करताहेत, अशी या संघटनांची भावना आहे. नागरिकांचाही त्यांना पाठिंबा आहे. त्यामुळे या संघटनांनी सुरुवातीला कराची आणि लाहोर येथील चिनी नागरिकांचे कारभार आणि कार्यालयांवर हल्ले केले. त्यानंतर त्यांनी चिनी कंपन्यांना आपलं लक्ष्य केलं.