मोठी बातमी! पाकिस्तानात ट्रेन हायजॅक, शेकडो प्रवाशांना ठेवले ओलीस; चकमकीत 6 सैनिक ठार
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2025 16:49 IST2025-03-11T16:49:33+5:302025-03-11T16:49:58+5:30
Pakistan Train Hijack: ओलिसांमध्ये पाकिस्तानी लष्कर, पोलीस, दहशतवाद विरोधी दल आणि इंटर-सर्व्हिसेस इंटेलिजन्सचे सक्रिय कर्मचारी सामील आहेत.

file photo
Pakistan Train Hijack :पाकिस्तानातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथील बलुच लिबरेशन आर्मीने (Baloch Liberation Army) पाकिस्तानातील बलुचिस्तानमध्ये जाफर एक्स्प्रेस हायजॅक केली आहे. या ट्रेनमध्ये शेकडो प्रवासी असून, बलुच आर्मीने या सर्व प्रवाशांनाही ओलीस ठेवले आहे. बलुच लिबरेशन आर्मीने सोशल मीडियावर ट्रेन हायजॅकची माहिती दिली. पाकिस्तानी सैन्य या ओलीसांची सुटका करण्याचे प्रयत्न करत आहे.
...तर ओलिसांना ठार करू
पाकिस्तानच्या दक्षिण-पश्चिम बलुचिस्तान प्रांतातील क्वेटा येथून खैबर पख्तूनख्वामधील पेशावरकडे जाफर एक्सप्रेस जात असताना ही घटना घडली. बलुच लिबरेशन आर्मीने सोशल मीडियावर एक निवेदन जारी करुन ही माहिती दिली. पाकिस्तानी सैन्याने कोणत्याही लष्करी कारवाईचा प्रयत्न केला, तर सर्व ओलीसांना ठार मारू आणि या मृत्यूची जबाबदारी संपूर्णपणे लष्करावर राहील, अशी धमकीही दिली आहे.
ट्रॅक उडवून ट्रेन थांबवली अन्...
बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने एक निवेदन जारी करून म्हटले की, मशकाफ, धादर आणि बोलानमध्ये ट्रेन हायजॅक करण्यात आले आहे. आमच्या सैनिकांनी आधी रेल्वे ट्रॅक बॉम्बने उडवून दिला, त्यानंतर ट्रेन थांबताच ताब्यात घेतले. ओलिसांमध्ये पाकिस्तानी लष्कर, पोलीस, दहशतवाद विरोधी दल (एटीएफ) आणि इंटर-सर्व्हिसेस इंटेलिजन्स (आयएसआय) चे सक्रिय कर्तव्य कर्मचारी देखील आहेत. हे सर्व सुट्टीवर पंजाबला जात होते.
6 सुरक्षा कर्मचाऱ्यांचीही हत्या
बलुच लिबरेशन आर्मीने सांगितले की, हे ऑपरेशन मजीद ब्रिगेड, एसटीओएस आणि फतेह पथकाने संयुक्तपणे केले आहे. आतापर्यंत सहा जवान शहीद झाले असून, शेकडो प्रवाशांचा जीव धोक्यात आला आहे. बीएलएचे प्रवक्ते जिआंद बलोच याने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. दरम्यान, पाकिस्तानी लष्कराने घटनास्थळी हेलिकॉप्टर आणि लढाऊ विमाने पाठवली आहेत.