पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2024 05:53 PM2024-05-02T17:53:24+5:302024-05-02T17:54:49+5:30
Pakistan Helicopters Wheat Crop Viral Video: पाकिस्तानात अत्यधुनिक कोब्रा हेलिकॉप्टर्स पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकवण्यासाठी तैनात केली गेल्याचा दावा टिकटॉक सोशल मीडियावर करण्यात आला आहे.
Pakistani Helicopters for Drying Wheat Crop Viral Video Truth: पाकिस्तानमधील एक व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. भारतात बॅन असलेल्या टिकटॉक या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर हा व्हिडीओ सर्वाधिक व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये गव्हाच्या शेतावर लष्कराची काही हेलिकॉप्टर्स घिरट्या घालताना दिसत आहेत. पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकवण्यासाठी लष्कराचे हेलिकॉप्टर वापरले जात असल्याचा दावा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करताना केला जात आहे. कारण अलीकडेच जवळजवळ तयार होत आलेले गव्हाचे पीक पावसामुळे ओले झाले होते. त्यामुळे व्हिडिओमध्ये गव्हाच्या शेताच्या वर ज्या प्रकारे काही हेलिकॉप्टर थांबले आहेत त्यावरून प्रथमदर्शनी हा दावा खरा वाटतो. पण तो केवळ भास आहे. व्हिडिओबाबत करण्यात येत असलेल्या दाव्यांमध्ये काहीही तथ्य नाही.
नेमका दावा काय?
गेल्या तीन-चार दिवसांपासून पाकिस्तानमध्ये सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये, कोब्रासारखे अत्यधुनिक हेलिकॉप्टर गव्हाच्या शेतावर दिसत आहेत. या हेलिकॉप्टरचा वापर पाकिस्तानी लष्कराकडून केला जातो. हा व्हिडीओ शेअर करताना काही यूजर्स म्हणत आहेत की, हे हेलिकॉप्टर पंजाबमध्ये पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या शेतातील गव्हाचे पीक सुकवण्यासाठी तैनात करण्यात आले आहेत. त्याचबरोबर काही लोक यासाठी पाकिस्तान सरकारची खिल्ली उडवत आहेत.
یہ کس مشن کی تیاری ہو رہی ہے؟ pic.twitter.com/GDc4HSiX39
— Iram Zahra (@PakistanLove72) April 30, 2024
व्हिडिओमागचे सत्य काय?
बीबीसी उर्दूच्या रिपोर्टनुसार, हा व्हिडिओ कधी आणि कुठे शूट करण्यात आला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. अशा स्थितीत ते पाकिस्तानचे आहे असे म्हणणे अयोग्य ठरेल. तसेच हा व्हिडीओ सध्याचा किंवा याच वर्षाचा असल्याबाबतही साशंकता आहे. पण हेलिकॉप्टर गहू सुकवत नसल्याचे अहवालात स्पष्टपणे सांगण्यात आले आहे. बीबीसी उर्दूने एका माजी आर्मी एव्हिएशन अधिकाऱ्याला विचारले की गहू सुकवण्याबाबतचा दावा खरा आहे का? अधिकाऱ्याने सांगितले की हा दावा साफ खोटा आहे. कारण व्हिडिओमध्ये दिसणारे हेलिकॉप्टर सामान्यत: लष्कराच्या हेलिकॉप्टरद्वारे वापरल्या जाणाऱ्या फॉर्मेशनमध्ये होते. हे कोब्रा हेलिकॉप्टर असल्याचेही त्यांनी ओळखले. त्यामुळे इतक्या क्षुल्लक कारणासाठी अत्यधुनिक हेलिकॉप्टरचा वापर होण्याची तिळमात्र शक्यता नाही, असे ते अधिकारी म्हणाले.