पाकव्याप्त काश्मीरमध्ये पाकिस्तान बांधणार 1.51 अब्ज डॉलर्सचा जलविद्युत प्रकल्प
By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2017 03:18 PM2017-12-30T15:18:54+5:302017-12-30T15:21:07+5:30
पाकव्याप्त काश्मीरमध्ये पाकिस्तानने 700 मेगावॅटचा जलविद्युत प्रल्प उभारण्याचा निर्णय घेतला आहे. 2022 साली पूर्ण होणाऱ्या या प्रकल्पासाठी 1.51 अब्ज अमेरिकन डॉलर्स खर्च येणार आहे.
इस्लामाबाद- पाकव्याप्त काश्मीरमध्ये पाकिस्तानने 700 मेगावॅटचा जलविद्युत प्रल्प उभारण्याचा निर्णय घेतला आहे. 2022 साली पूर्ण होणाऱ्या या प्रकल्पासाठी 1.51 अब्ज अमेरिकन डॉलर्स खर्च येणार असल्याचे माध्यमांनी दिलेल्या वृत्तामधून स्पष्ट झाले आहे.
पाकव्याप्त काश्मीरमध्ये "आझाद पट्टान जलविद्युत प्रकल्प" नावाचा प्रकल्प बांधण्याचा पाकिस्तानने निर्णय घेतला आहे.
या प्रकल्पाची क्षमता 700 मेगावॅट असून पाकिस्तान त्यासाठी येणाऱ्या 1.51 अब्ज डॉलर्स खर्चासाठी परकीय संस्थांची मदत घेणार आहे. हा प्रकल्प सुधानोटी जिल्ह्यामध्ये झेलम नदीवर बांधण्यात येणार आहे. इस्लामाबादपासून हा प्रकल्प केवळ 90 किमी अंतरावर आहे. या प्रकल्पाच्या प्रस्तावित खर्चापैकी 75 टक्के म्हणजे 1.13 अब्ज डॉलर्स कर्जाद्वारे तर 25 टक्के रक्कम म्हणजे 37.9 कोटी डॉलर्स समभागांद्वारे उभे करण्यात येतील. कर्जामध्ये परकीय संस्था, देश, बॅंकांचाही समावेश असेल. या कर्जाच्य़ा परताव्यासाठी 18 वर्षे मुदत असेल.
पाकिस्तानातील एकूण वीज उत्पादनामध्ये जलविद्युत ऊर्जेचा 28 टक्के वाटा आहे. पाकिस्तानाने अजूनही जलविद्युत ऊर्जेचे स्त्रोत पूर्ण विकसीत केलेले नाहीत तर केवळ 12 टक्केच स्त्रोत विकसीत करण्यात आलेले आहेत असे पाकिस्तानातील वर्तमानपत्राने प्रसिद्ध केले आहे.