पाकिस्तान नरमला; कुलभूषण जाधव यांना अखेर मिळणार राजनैतिक मदत
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2019 09:44 IST2019-07-19T09:43:31+5:302019-07-19T09:44:11+5:30
निकालानंतर 24 तासातच पाकिस्तानने स्वत:ला जबाबदार देश असल्याचे सांगत गुरुवारी रात्री उशिरा हा निर्णय घेतला आहे.

पाकिस्तान नरमला; कुलभूषण जाधव यांना अखेर मिळणार राजनैतिक मदत
इस्लामाबाद : आंतरराष्ट्रीय न्यायालयाने फटकारल्यानंतर कुलभूषण जाधव यांना राजनैतिक मदत देण्यासाठी तब्बल 16 वेळा नकार देणारा पाकिस्तान नरमला आहे. निकालानंतर 24 तासातच पाकिस्तानने स्वत:ला जबाबदार देश असल्याचे सांगत गुरुवारी रात्री उशिरा हा निर्णय घेतला आहे.
पाकिस्तानी मंत्रालयाने म्हटले आहे की, देशातील कायद्यानुसार भारतीय नागरिक असलेल्या जाधवना राजनैतिक मदत देण्यास परवानगी देण्यात येणार आहे. त्यावर काम सुरू आहे. महत्वाचे म्हणजे याआधी पाकिस्तानने सलग 16 वेळा जाधव यांना राजनैतिक मदत देण्यास भारताला नकार दिला होता. यानंतर भारताने आंतरराष्ट्रीय न्यायालायचे दरवाजे ठोठावले होते.
पाक मंत्रालयाने हे देखील स्पष्ट केले आहे की, जाधव यांना राजनैतिक संबंधांबाबत व्हिएन्ना करारानुसार त्यांच्या अधिकाराची माहिती देण्यात आली आहे. एक जबाबदार देश असल्याच्या नात्यातून कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानच्या कायद्यानुसार ही मदत पोहोचवली जाईल.
आयसीजेने पाकिस्तानला दिला होता आदेश
आंतरराष्ट्रीय न्यायालयाने पाकिस्तानला आदेश देत जाधव यांच्या फाशीच्या शिक्षेवर पुन्हा विचार करण्याच आणि राजनैतिक मदत देण्याचे आदेश दिले होते. हा भारताचा मोठा विजय मानला जात आहे. भारतीय नौदलाचे निवृत्त अधिकारी जाधव यांना 2017 मध्ये पाकिस्तानने कथित हेरगिरी आणि दहशतवादी कारवायांच्या आरोपाखाली दोषी ठरवून फाशीची शिक्षा सुनावली होती.