पाकिस्तानचा लवकरच सौदी अरेबिया होणार; भर समुद्रात मोठे घबाड सापडले
By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2024 07:51 PM2024-09-07T19:51:31+5:302024-09-07T19:51:40+5:30
पाकिस्तानला कच्च्या तेलाबरोबरच नैसर्गिक गॅसही मिळाला आहे. डॉन न्यूजनुसार पाकिस्तानचा हा जिओग्राफिक सर्व्हे तीन वर्षांनंतर पूर्ण झाला आहे.
पाकिस्तानच्या हाती घबाड लागले आहे. समुद्रात मोठे पेट्रोलिअमचे साठे मिळाले असून दहशतवाद्यांना पोसायचे सोडले तर पाकिस्तानचा सौदी अरेबिया होण्याची शक्यता बळावली आहे. हा खजाना एवढा मोठा आहे की पाकिस्तानची आर्थिक परिस्थिती सुधारू शकते.
पाकिस्तानला कच्च्या तेलाबरोबरच नैसर्गिक गॅसही मिळाला आहे. डॉन न्यूजनुसार पाकिस्तानचा हा जिओग्राफिक सर्व्हे तीन वर्षांनंतर पूर्ण झाला आहे. एका मित्रदेशाच्या मदतीने पाकिस्तानने हा साठा शोधला आहे. भौगोलिक सर्वेक्षणातून ही ठिकाणे शोधली गेली असून याची माहिती पाकिस्तान सरकारला देण्यात आल्याचे एका सूत्राने सांगितले आहे.
या साठ्याचा आकार किती विशाल आहे याचा शोध घेतला जात आहे. तसेच ड्रिलिंग आणि तेल काढण्यासाठी देखील काही वर्षे जाऊ शकतात. यासाठी बिडिंग प्रक्रिया आणि संशोधन सुरु केले जाणार आहे. समुद्रात इतर मौल्यवान खनिजे आणि घटक सापडण्याची शक्यता देखील वर्तविण्यात आली आहे.
प्राथमिक अंदाजानुसार जगातील चौथ्या क्रमांकाचा तेल आणि वायूचा साठा असू शकतो. जगात व्हेनेझुएलामध्ये सध्या सर्वात जास्त तेलाचे साठे आहेत. तेल साठ्याच्या उत्पादनात हिल्या पाचमध्ये सौदी अरेबिया, इराण, कॅनडा आणि इराक या पाच देशांचे प्राबल्य आहे.
हे तेलसाठे काढण्यासाठी पाकिस्तानला सुमारे 5 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक आवश्यक आहे. एवढी रक्कम काही पाकिस्तानकडे नाही. यामुळे पाकिस्तानला अन्य देशांची मदत घ्यावी लागणार आहे. असे झाल्यास पाकिस्तानचा फायदा कमी होणार आहे. विहिरी विकसित करण्यासाठी आणि उत्खनन आणि इंधन उत्पादनासाठी आवश्यक पायाभूत सुविधा स्थापित करण्यासाठी हा पैसा लागणार आहे.