दहशतवादाच्या मुद्द्यावर पाकिस्तानला अजून एक धक्का, FATF कडून संशयित देशांच्या यादीत समावेश
By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2018 05:14 PM2018-06-28T17:14:43+5:302018-06-28T17:15:17+5:30
भारतविरोधी कारवायांसाठी दहशतवाद्यांना पोसणाऱ्या पाकिस्तानला फायनँशियल अॅक्शन टास्क फोर्सने (FATF) जबर दणका दिला आहे.
इस्लामाबाद - भारतविरोधी कारवायांसाठी दहशतवाद्यांना पोसणाऱ्या पाकिस्तानला फायनँशियल अॅक्शन टास्क फोर्सने (FATF) जबर दणका दिला आहे. FATF ने दहशतवाद्यांना होणारा वित्त पुरवठा रोखण्यात अपयशी ठरल्याने पाकिस्तानचा समावेश ग्रे लिस्ट म्हणजेच संशयित देशांच्या यादीत समावेश केला आहे.
FATF ने पाकिस्तानला एक 26 कलमी कृती योजना पाठवली होती, जेणेकरून पाकिस्ताना या कारवाईपासून वाचता येईल. 37 देशांच्या या संघटनेचा निर्णय आपल्या विरोधात येऊ नये यासाठी पाकिस्तान प्रयत्नशील होते. मात्र त्यांच्या हाती निराशा लागली आहे. पण FATFच्या ब्लॅक लिस्टमध्ये न येणे हीच त्यांच्यासाठी दिलासा देणारी बाब ठरली आहे.
पाकिस्तानचा ग्रे लिस्टमध्ये समावेश करण्याचा निर्णय FATF च्या प्लेनरी सेशनमध्ये घेण्यात आला. FATF ही पॅरिसस्थित आंतर सरकारी संस्था आहे. 1989 साली तिची स्थापना करण्यात आली होती. अवैधरीत्या देण्यात येणारी आर्थिक मदत रोखण्यासाठी नियम बनवण्याचे काम ही संस्था पाहते. FATF च्या ग्रे लिस्टमधील देशांना आंतरराष्ट्रीय संस्थांकडून कर्ज घेताना अडचणींचा सामना करावा लागतो.
पाकिस्तानने FATF कडे 15 महिन्यांची एक योजना सादर केली होती. तसेच मनी लाँड्रिंग आणि दहशतवाद्यांना मिळणारा वित्तपुरवठा रोखण्यासाठी आपण उपाययोजना केल्याचा दावा त्यांनी केला होता. त्यानंतरही FATF ने ही कारवाई केली आहे. या कारवाईमुळे पाकिस्तनच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होण्याची शक्यता आहे.