हा पाकिस्तानी २५ वर्षे जगतोय फक्त पाने खाऊन!
By admin | Published: April 24, 2017 12:51 AM2017-04-24T00:51:59+5:302017-04-24T00:51:59+5:30
पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील एक माणूस गेली २५ वर्षे फक्त झाडांची ताजी पाने व लाकूड खाऊन जगत असून तो कधीही आजारी पडलेला नाही!
लाहोर : पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील एक माणूस गेली २५ वर्षे फक्त झाडांची ताजी पाने व लाकूड खाऊन जगत असून तो कधीही आजारी पडलेला नाही!
गुजरानवाला जिल्ह्यात राहणाऱ्या या ५० वर्षांच्या व्यक्तीचे नाव मेहमूद बट असे असून काहीही कामधंदा नसल्याने, एका वेळच्या जेवणाचीही भ्रांत पडली, तेव्हा सुमारे २५ वर्षांपूर्वी त्याने झाडांची पाने खाण्यास सुरुवात केली. त्यानंतर, आता पाने व लाकूड खाऊन जगणे त्याच्या जणू अंगवळणीच पडले आहे, असे वृत्त ‘दि न्यूज इंटरनॅशनल’ने दिले.
मेहमूद बटने या वृत्तपत्रास सांगितले की, माझ्या घरात अठरा विश्वे दारिद्र्य होते. काहीही घेण्याची ऐपत नव्हती व एक वेळचे जेवण मिळणेही मुश्कील व्हायचे. त्या वेळी रस्त्यावर भीक मागण्यापेक्षा लाकूड खाऊन जगणे चांगले, असा विचार केला आणि हा आहार सुरू केला.
या बातमीनुसार हळूहळू मेहमूद बटची परिस्थिती सुधारली. त्याला काम मिळू लागले व जेवणखाण करणेही परवडू लागले. तरीही इतर अन्नापेक्षा त्याला पाने व लाकूडच खात राहावेसे वाटत राहिले व त्याने तोच आहार आजपर्यंत सुरू ठेवला आहे.
बटची एक गाठवाची गाडी आहे. त्यावरून लोकांच्या सामानाची ने-आण करून तो दिवसाकाठी ६०० रुपये कमावतो. सामानाची गाडी घेऊन जात असताना तो कुठे हिरवी, कोवळी पाने दिसतात का, हे शोधत असतो!
वड, ताली आणि सुखचैन या झाडांची पाने आपल्याला विशेष आवडतात, असे बट सांगतो.खाण्याच्या या अनोख्या सवयीमुळे बट त्या परिसरात लोकप्रिय आहे. तोंडात पानांचा तोबरा भरून चावत असताना तो लोकांना
नेहमी दिसतो. मात्र, तो कधी आजारी पडल्याचे कोणाला आठवत नाही. (वृत्तसंस्था)