कारगिल युद्धाबाबत पाकिस्तानचा मोठा खुलासा; लष्करप्रमुख म्हणाले, "अनेकांनी आपल्या..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2024 16:57 IST2024-09-07T16:52:30+5:302024-09-07T16:57:10+5:30
पाकिस्तानच्या लष्कराने प्रथमच भारताविरुद्ध १९९९ च्या कारगिल युद्धात आपला सहभाग जाहीरपणे मान्य केला आहे.

कारगिल युद्धाबाबत पाकिस्तानचा मोठा खुलासा; लष्करप्रमुख म्हणाले, "अनेकांनी आपल्या..."
Kargil War : कारगिल युद्धाच्या जवळपास २५ वर्षांनंतर पाकिस्तानी लष्कराने भारतासोबतच्या या संघर्षात आपली भूमिका स्पष्ट केली आहे. पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांनी शनिवारी अधिकृतपणे १९९९ च्या भारतासोबतच्या कारगिल युद्धात पाकिस्तानी लष्कराच्या सहभागाची कबुली दिली. अशा प्रकारे खुलासा करत पाकिस्तानी लष्कराने कारगिल युद्धात आपली थेट भूमिका जाहीरपणे मान्य केल्याचे पहिल्यांदाच घडलं आहे. संरक्षण दिनाच्या भाषणादरम्यान लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांनी हे वक्तव्य केले. त्यांच्या या वक्तव्याने आता आंतरराष्ट्रीय पातळीवर चर्चा सुरु झाल्या आहेत.
१९९९ च्या कारगिल युद्धात पाकिस्तानी लष्कराने आपल्या थेट सहभागाची जाहीरपणे कबुली देण्याची ही पहिलीच वेळ आहे. कारगिल संघर्षादरम्यानही इस्लामाबादने थेट लष्करी सहभाग नाकारला होता आणि घुसखोरांना काश्मिरी स्वातंत्र्य सैनिक आणि मुजाहिदीन असे म्हटलं होते. पाकिस्तानने दावा केला होता की पाकिस्तानी सैन्य फक्त सक्रियपणे गस्त घालत होते तर आदिवासी नेत्यांनी कारगिलमध्ये उंचीवर जाऊन ताबा मिळवला होता.
आता संरक्षण दिनाच्या एका भाषणात पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांनी युद्धात सामील असल्याची कबुली दिली. "१९४८, १९६५, १९७१ असो किंवा भारत-पाकिस्तानमधील कारगिल युद्ध असो किंवा सियाचीन असो अनेकांनी यामध्ये आपल्या प्राणांची आहुती दिली आहे," असं लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर म्हणाले.
याआधी पाकिस्तानी लष्कराने सातत्याने कारगिल युद्धात थेट सहभाग नाकारला होता. मे ते जुलै १९९९ दरम्यान जम्मू-काश्मीरमधील कारगिलमध्ये ही लढाई झाली. आता जनरल मुनीर यांचा खुलासा हा पाकिस्तानच्या अधिकृत भूमिकेत मोठा आणण्याची शक्यता आहे. कारगिल जिल्ह्यातील मोक्याची जागा काबीज करण्याच्या उद्देशाने पाकिस्तानी सैन्य आणि दहशतवाद्यांनी भारतीय हद्दीत घुसखोरी करून कारगिल युद्धाची सुरुवात केली होती. भारताच्या विजयाने आणि या भागातून पाकिस्तानी सैन्याने माघार घेतल्याने संघर्ष संपला. त्यावेळी अमेरिका आणि इतर प्रमुख देशांनी पाकिस्तानच्या भूमिकेबद्दल टीका केली होती.
दरम्यान, कारगिल युद्धात ५२७ भारतीय जवान शहीद झाले. तर पाकिस्तानने अद्यापही अधिकृतपणे आपले किती सैनिक मारले हे सांगितलेले नाहीयय मात्र कारगिल युद्धात पाकिस्तानचे २७०० ते ४००० सैनिक मारले गेल्याचे म्हटलं जातं.