भारतापेक्षा पाकिस्तानी नागरिक अधिक आनंदी; फिनलँड अव्वल, भारत १२६ व्या स्थानावर
By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2024 06:40 AM2024-03-21T06:40:55+5:302024-03-21T06:55:15+5:30
भारत आनंदी देशांमध्ये १४३ देशांच्या यादीत १२६ व्या स्थानावर असून, त्या तुलनेत पाकिस्तान मात्र १०८ व्या स्थानावर आहे.
नवी दिल्ली : दहशतवादी हल्ले आणि आर्थिक डोलारा ढासळलेला पाकिस्तान हा भारतापेक्षा अधिक आनंदी देश असल्याचे संयुक्त राष्ट्रांच्या अहवालातून समोर आले आहे. भारत आनंदी देशांमध्ये १४३ देशांच्या यादीत १२६ व्या स्थानावर असून, त्या तुलनेत पाकिस्तान मात्र १०८ व्या स्थानावर आहे.
आनंदी असण्याचे निकष काय?
हा अहवाल तयार करण्यासाठी ६ पॅरामीटर्सवर आधारित प्रश्नावली तयार करण्यात आली होती. यामध्ये देशातील प्रत्येकाचे उत्पन्न, सामाजिक स्थिती, औदार्य, भ्रष्टाचार, सामाजिक स्वातंत्र्य, आरोग्य यांच्या आधारे आनंदी देश कोणता याचे स्थान ठरविण्यात आले. यात हजारो नागरिकांना सहभागी करून घेण्यात आले होते.
सर्वात आनंदी देश कोणता?
फिनलंडने सलग सातव्यांदा जगातील सर्वात आनंदी देशांच्या यादीत पहिले स्थान मिळवले आहे. येथे केवळ ५५ लाख लोकसंख्या आहे.त्याचवेळी अफगाणिस्तान या यादीत शेवटच्या स्थानावर राहिला. अहवालानुसार सर्वाधिक आनंदी देश युरोपियन आहेत.
भारताच्या आजूबाजूला काय?
आनंदी देशांच्या यादीत भारताचे स्थान १२६ वे असून, त्यानंतर १२७ व्या स्थानावर इजिप्त आहे. तर १२८ व्या स्थानावर श्रीलंका आहे. १२९ व्या स्थानावर बांगलादेश आहे. १३०व्या स्थानावर इथोपिया आहे. १३१ स्थानावर टांझानिया हा देश आहे.
भारताच्या वर १२५ स्थानी जॉर्डन, १२४ व्या स्थानी टोगो, १२३ व्या स्थानी मादागास्कर हा पूर्व आफ्रिकेतील एक द्वीप-देश आहे. त्यावर माली, लिबिया, घाना, उगांडा, केनिया, युक्रेन सारखे देश आहेत. या यादीत चीन ६०व्या, नेपाळ ९३व्या म्यॅनमार ११८ स्थानावर आहे.
बड्या देशांचे स्थान घसरले
१० वर्षांत प्रथमच अमेरिका आणि जर्मनी प्रमुख आनंदी देशांच्या यादीतून बाहेर गेले आहेत. ते २३ व्या आणि २४ व्या स्थानावर पोहोचले आहेत. अमेरिकेचे स्थान गेल्या वर्षी १६ वे होते. या वर्षी कॅनडा यादीत १५ व्या स्थानावर आहे.
भारतात वृद्ध खूश का आहेत?
भारतात साठी पार केलेले नागरिक तरुणांच्या तुलनेत अधिक खूश आहेत. यातही भारतीय वृद्ध पुरुष महिलांच्या तुलनेत अधिक आनंदी आहेत. संपूर्ण जगातच प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या तुलनेत आनंदी महिला कमी आहेत.
भारतात शिक्षण आणि जातव्यवस्था आनंदी राहण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडत आहे. जे लोक कमी शिकलेले आहेत आणि अनूसूचित जाती, जमातीचे आहेत, त्यांच्यामध्ये आनंदी असण्याचे प्रमाण कमी आहे.
सर्वांत आनंदी देश कोणते?
रँक देश
१ फिनलँड
२ डेन्मार्क
३ आईसलँड
४ स्वीडन
५ इस्रायल
६ नेदरलँड
७ नॉर्वे
८ लक्झेंबर्ग
९ स्वित्झर्लंड
१० ऑस्ट्रेलिया
सर्वात दु:खी देश कोणते?
रँक देश
१४३ अफगाणिस्तान
१४२ लेबनान
१४१ लेसोथो
१४० सियेरा लिओन
१३९ काँगो
१३८ झिम्बाब्वे
१३७ बोत्स्वाना
१३६ मलावी