महिलेनं व्हॉट्सअपवर केला असा मेसेज, पाकिस्तानच्या न्यायालयाने सुनावली फाशीची शिक्षा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2022 05:03 PM2022-01-20T17:03:24+5:302022-01-20T17:04:26+5:30
पाकिस्तानच्या रावळपिंडी कोर्टाने संबंधित खटल्यात निर्णय दिला आहे. डॉन वृत्तपत्रानुसार, तक्रारदार फारुक हसनात यांच्या तक्रारीवरुन बुधवारी न्यायालयाने हा निकाला दिला आहे.
रावळपिंडी - पाकिस्तानमधून एक घटना समोर आली असून महिलेस ईशनिंदा केल्यामुळे थेट फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. संबंधित महिलेनं व्हॉट्सअपवर महंमद पैगंबर यांच्याविरुद्ध अपशब्द वापरले होते. ही घटना जुनीच आहे, पण न्यायालयाने महिलेस मृत्यूदंडाशी शिक्षा सुनावल्यामुळे पुन्हा ही घटना चर्चेत आली आहे. त्यामुळे, पाकिस्तानमध्ये ईशनिंदा हा मुद्दाही पुन्हा महत्वपूर्ण चर्चेचा बनला आहे. पाकिस्तानच्या रावळपिंडी कोर्टाशी ही घटना संबंधित आहे.
पाकिस्तानच्या रावळपिंडी कोर्टाने संबंधित खटल्यात निर्णय दिला आहे. डॉन वृत्तपत्रानुसार, तक्रारदार फारुक हसनात यांच्या तक्रारीवरुन बुधवारी न्यायालयाने हा निकाला दिला आहे. आरोपी महिलेचं नाव अनिका अतीक असून तिच्यावर तीन आरोप सिद्ध झाले आहेत. या महिलेनं पैगंबर महंमद साहब यांचा अवमान, इस्लाम धर्माचा अपमान, आणि सायबर कायद्याचं उल्लंघन केल्याचा आरोप तक्रारदाराने केला होता. महिलेनं 2020 मध्ये आपला मित्र असलेल्या फारुकला ईशनिंदाचे मेसेज व्हॉट्सअपद्वारे पाठवले होते.
फारुकने अनिकाला हे मेसेज डिलीट करण्याचे आणि माफी मागण्याचे सूचवले होते. मात्र, अनिकाने नकार दिल्यामुळे फारुकने पोलिसात तक्रार दाखल केली. त्यानंतर, पोलिसांनी प्राथमिक तपासअंती आरोपी महिलेला अटक करुन गुन्हा नोंद केला. त्यामुळे हे प्रकरण रावळपिंडी न्यायालयात पोहोचले. या प्रकरणी न्यायालयाने बुधवारी आरोपी महिलेस फाशीची शिक्षा सुनावली. विशेष म्हणजे अनिक आणि फारुक हे दोघेही चांगले मित्र होते. पण, त्यांच्यात कशावरुन तरी भांडण झाले, ते पुन्हा चांगलेच वादग्रस्त बनले.